
परभणी, 05 सप्टेंबर (हिं.स.)।
सेलू शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देत नागरिकांना आधुनिक व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विकासकामे हाती घेण्यात येत आहेत. ‘नमो उद्याना’च्या लोकार्पणातून विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली असून, आगामी काळात सेलूचा कायापालट करण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.सेलू नगरपरिषदेच्या नमो उद्यानाचे पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते आज उद्घाटन पार पडले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमास नगराध्यक्ष मिलिंद सावंत, उपनगराध्यक्ष साईराज बोराडे, तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, माजी नगराध्यक्ष विनोदराव बोराडे, मुख्याधिकारी महेश गायकवाड बांधकाम सभापती मनीष कदम आदींसह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की, आज सेलूकरांच्या सेवेसाठी ‘नमो उद्यान’ लोकार्पित करताना मला विशेष आनंद होत आहे. नागरिकांना एक सुंदर आणि उपयुक्त उद्यान उपलब्ध करून देत आहोत. सेलू शहराचा सर्वांगीण विकास करून मराठवाड्यातील एक विकसित आणि आधुनिक शहर म्हणून सेलूची ओळख निर्माण करण्याचा माझा मानस आहे. आगामी काळात सेलू शहरात अनेक महत्त्वाची विकास कामे केली जाणार आहेत. शहरात क्रीडांगणासाठी सुमारे सात एकर जागा उपलब्ध आहे. आतापर्यंत या ठिकाणी सुमारे पाच कोटी रुपयांची कामे करण्यात आली आहेत. मात्र, हे क्रीडांगण आणखी सुंदर आणि दर्जेदार कसे करता येईल, यासाठीही आपण प्रयत्न करणार आहोत. आपली मुले निसर्गाशी जोडली गेली पाहिजेत. त्यांचा मोबाईलचा वापर कमी झाला पाहिजे आणि खेळाकडे त्यांचा कल वाढला पाहिजे. यासाठी क्रीडा सुविधांना अधिक प्राधान्य दिले जाईल.‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून सुमारे २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यातूनही सेलूसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच विद्यार्थ्यांसाठी सुंदर आणि सुसज्ज अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे पालकमंत्री यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis