
यवतमाळ 05 सप्टेंबर (हिं.स.)
शेतकरी चिंताग्रस्त, पिके वाचविण्याची धडपड
आकाशात काळेकुट्ट ढग दाटून येतात, वातावरण ढगाळ होते. परंतु, प्रत्यक्षात पाऊस पडत नसल्याने शेतकर्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पावसाअभावी शेतपिके करपू लागल्याने ती वाचविण्यासाठी दांड पाणी, स्प्रिंकलर व बोअरवेलच्या माध्यमातून सिंचन करण्याची धडपड सुरू केली आहे. मात्र, ऐन सिंचनाच्या वेळी खंडित वीजपुरवठा शेतकऱ्यांसमोर नवीन संकट निर्माण करीत आहे. तालुक्यात तालुक्यात कापूस २८ हजार २७० हेक्टर, सोयाबीन १७ हजार ३०३ हेक्टर तर तूरची पाच हजार ९६२ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून अपेक्षित असा दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतातील पिकांना पाण्याची तीव्र गरज भासत आहे. पावसाच्या भरवशावर शेती करणार्या कोरडवाहू शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. ज्यांच्याकडे विहीर अथवा बोअरवेलची सुविधा आहे, ते शेतकरी उपलब्ध पाण्याचा वापर करून पिकांना जीवदान देण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्प्रिंकलरच्या माध्यमातून पिकांना पाणी देण्यासाठी शेतकर्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. एका ठिकाणी स्प्रिंकलरची शिफ्ट लावण्यासाठी तब्बल दीड ते दोन तासांचा कालावधी लागत आहे. एका ठिकाणचे सिंचन पूर्ण करून दुसऱ्या ठिकाणी पाइप व स्प्रिंकलर हलविण्यातही मोठा वेळ जात आहे. अशातच ऐनवेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकर्यांचे परिश्रम वाया जात आहे. त्यामुळे पाणी असूनही शेतपिके तहानलेली राहण्याची वेळ आली आहे. आधीच पावसाच्या लहरीपणामुळे चिंतेत असलेल्या शेतकर्यांसमोर आता अनियमित वीजपुरवठ्याचे नवे संकट उभे ठाकले आहे. पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. सोयाबीन, कापूस, तूर तसेच इतर खरीप पिकांना सध्या पावसाची नितांत आवश्यकता आहे. मात्र, आकाशात दररोज पाण्याचे काळे ढग जमा होत असले तरी पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेला कोरडवाहू शेतकरी तर पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असल्याने त्याच्यासमोर पावसाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, एकीकडे आसमानी संकट आणि दुसरीकडे वीजपुरवठ्याचे संकट अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकर्यांचे लक्ष आता आकाशाकडे लागले आहे. सिंचनासाठी उपलब्ध असलेल्या वेळेत पुरेसा वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी