यवतमाळ - जिल्हा बँकेसाठी शिंदेसेना-काँग्रेसमध्ये खलबते
यवतमाळ, 05 सप्टेंबर (हिं.स.) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिंदेसेना आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची विश्रामगृह येथे प्राथमिक बैठक झाली. निवडणुकीत संभाव्य आघाडी करण्यासह तालुका आणि जिल्
यवतमाळ - जिल्हा बँकेसाठी शिंदेसेना-काँग्रेसमध्ये खलबते


यवतमाळ, 05 सप्टेंबर (हिं.स.) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिंदेसेना आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची विश्रामगृह येथे प्राथमिक बैठक झाली. निवडणुकीत संभाव्य आघाडी करण्यासह तालुका आणि जिल्हा गटातील जागांच्या वाटपाबाबत या बैठकीत प्राथमिक स्वरूपात चर्चा झाल्याची माहिती आहे. निवडणूक कार्यक्रम सोमवारी (ता. सात) जाहीर होण्याची शक्यता असल्याने त्यापूर्वीच राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जिल्ह्यातील सहकार क्षेत्राबरोबरच राजकीयदृष्ट्याही महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्यापूर्वीच इच्छुक उमेदवार आणि राजकीय नेत्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदेसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिंदेसेना-काँग्रेसच्या बैठकीत पहिल्या टप्प्यात दोन्ही पक्षांची ताकद आणि संभाव्य जागावाटप याबाबत चर्चा करण्यात आली. तालुका गट तसेच जिल्हा गटातील कोणत्या जागा कोणत्या पक्षाने लढवाव्यात, यावर नेत्यांनी आपापली भूमिका मांडल्याचे समजते. मात्र, अद्याप कोणत्याही जागेवर अंतिम निर्णय झालेला नसून, ही चर्चा प्राथमिक स्वरूपाची असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे, सहकार क्षेत्रातील प्रभाव आणि संबंधित गटांमधील उमेदवारांची ताकद यांचा विचार करून जागावाटप निश्चित केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील बैठकींमध्ये काही जागांबाबत तडजोडीचे सूत्र पुढे येण्याची शक्यता आहे. बैठकीला शिंदेसेनेकडून पालकमंत्री संजय राठोड, खासदार संजय देशमुख, विदर्भ समन्वयक पराग पिंगळे उपस्थित होते. काँग्रेसकडून माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी अध्यक्ष मनीष पाटील आणि अॅड. प्रफुल्ल मानकर यांनी सहभाग घेतला. दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेमुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande