मनमाडमध्ये इंदूर-पुणे महामार्गावर जोरदार ‘रस्ता रोको’ आंदोलन
मनमाड , 05 सप्टेंबर (हिं.स.)। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसलेले मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज मनमाड शहरात मर
मनमाडमध्ये इंदूर-पुणे महामार्गावर जोरदार ‘रस्ता रोको’ आंदोलन


मनमाड , 05 सप्टेंबर (हिं.स.)।

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा

: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसलेले मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज मनमाड शहरात मराठा बांधवांच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी इंदूर-पुणे महामार्गावर एकत्र येत रस्त्यावर ठिय्या मांडला आणि भव्य ‘रस्ता रोको’ आंदोलन केले.या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे ठप्प झाली होती. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

गेल्या सहा दिवसापासून अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मनमाड आणि परिसरातील शेकडो मराठा बांधव, महिला आणि तरुण इंदूर-पुणे महामार्गावर एकत्र आले. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आणि मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आंदोलकांनी थेट रस्त्यावर ठाण मांडले. यावेळी महिलांनी रस्त्याच्या मध्यभागी बसून प्रशासनाचा आणि सरकारच्या धोरणांचा निषेध केला. आंदोलना दरम्यान मराठा समाजाच्या वतीने प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. एक मराठा, कोटी मराठा, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है आणि आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणांनी संपूर्ण महामार्ग परिसर दुमदुमून गेला होता. सरकारने मराठा समाजाला तातडीने आणि टिकणारे आरक्षण द्यावे, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी लावून धरली.

आंदोलनाची माहिती मिळताच मनमाड पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महामार्गावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या उपस्थितीत आंदोलकांनी शांततापूर्ण मार्गाने, पण अत्यंत आक्रमकपणे आपली मागणी मांडली. इंदूर-पुणे हा अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा महामार्ग असल्याने रस्ता रोकोमुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रवासी, एसटी बसेस आणि अवजड वाहतूक करणारी वाहने रस्त्यातच अडकून पडली होती. आंदोलन मागे घेतल्यानंतर संथ गतीने वाहतूक पुन्हा पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केले.

मुस्लिम समाजाच्या वतीने पाणी वाटप...

सध्या पावसाळा सुरू असला तरी उन्हाचा तडाखा सुरू आहे आज मराठा समाजाच्या वतीने इंदुर पुणे महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलें यावेळी आंदोलन कर्त्याना घोषणाबाजी करून तहान लागली यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने फिरोज शेख व इतरांनी पाण्याचे बॉक्स आणून पाणी वाटप करून एकतेचा संदेश दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande