
यवतमाळ, 05 सप्टेंबर (हिं.स.) सलग दोन वर्षांपासून शिक्षक दिनी देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचा मुहूर्त हुकला आहे. शेवटच्या दिवसांपर्यंत सोळा तालुक्यातून तब्बल ३१ प्रस्ताव प्राप्त झाले. आता निवड केल्यानंतर आयुक्तालयात मंजुरीकरिता पाठविण्यात येणार आहे. तद्नंतर सोहळ्याचे आयोजन शिक्षण विभागाच्या वतीने केले जाणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना शिक्षकांना सन्मानित करण्यात येते. दरवर्षी शिक्षक दिनाच्या मुहूर्तावर हा सोहळा आयोजित केल्या जाते. मात्र, मागील चार ते पाच वर्षांपासून विविध कारणाने पुरस्कार वितरण सोहळा विविध कारणामुळे लांबणीवर पडत आहे. गतवर्षीचे शिक्षक पुरस्कार वितरण करण्यात आलेच नाही. सुरवातीला निवड प्रक्रिया, त्यानंतर आयुक्तालयाच्या मंजुरीला विलंब झाल्याने पुरस्कार वितरण लांबणीवर पडले होते. शेवटी मंजुरीत मिळाली होती. मात्र, लोकप्रतिनिधींची तारीख न मिळाल्यामुळे शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेच नाही. त्यामुळे यंदा शिक्षण दिनाच्या मुहूर्तावर पुरस्कार वितरण करण्याचा चंग शिक्षण विभागाने बांधला होता. ऑनलाइन प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन शिक्षकांना करण्यात आले होते. सुरवातीला अत्यल्प प्रस्ताव प्राप्त झाले होते. मुदतवाढ दिल्यानंतर जिल्ह्याभरातून शिक्षकांचे ३१ प्रस्ताव प्राप्त झाले होते. तद्नंतर निवड प्रक्रिया होऊ शकली नाही. अशा परिस्थितीत आज शिक्षक दिनाच्या मुहूर्तावर यंदाही शिक्षक पुरस्कार वितरण होणार नाही, ह्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. लवकरच प्रस्तावाची पडताळणी केल्या जाणार असून, १६ शिक्षकांची निवड केली जाईल. तद्नंतर आयुक्तालयात मंजुरीकरिता पाठविण्यात येणार आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केल्या जाईल. सध्यातरी शिक्षकांना पुरस्कारासाठी प्रतीक्षाच करा, असे म्हणण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
माध्यमीकमधून एकही प्रस्ताव नाही जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या माध्यमातून सोळा प्राथमिक, माध्यमिक आणि दिव्यांग संवर्गातून एक, असे मिळून १८ शिक्षकांना सन्मानित करण्यात येते. असे असताना यंदा माध्यमिक गटातून एकाही शिक्षकाचा प्रस्ताव प्राप्त झाला नाही. त्यामुळे यंदा केवळ १७ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
-----------------------------------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी