नाशकात गणेश मूर्ती घेऊन जाणाऱ्या ट्रॉलीचे चाक खड्ड्यात अडकले
नाशिक, 05 सप्टेंबर (हिं.स.)। मनपाच्या कारभारावर गणेश मंडळे नाराज – गणेशोत्सवाची धामधुम सुरू झाली असताना शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसमोर खड्डेमय रस्ते आणि खोदकामामुळे आव्हान निर्माण झाले आहे. गंगापूर रस्त्यावर गणेश मंडळाची मूर्ती घेऊन निघा
नाशकात गणेश मूर्ती घेऊन जाणाऱ्या ट्रॉलीचे चाक खड्ड्यात अडकले


नाशिक, 05 सप्टेंबर (हिं.स.)।

मनपाच्या कारभारावर गणेश मंडळे नाराज

– गणेशोत्सवाची धामधुम सुरू झाली असताना शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसमोर खड्डेमय रस्ते आणि खोदकामामुळे आव्हान निर्माण झाले आहे. गंगापूर रस्त्यावर गणेश मंडळाची मूर्ती घेऊन निघालेल्या ट्रॉलीचे चाक खड्ड्यात अडकले. गणेश भक्तांनी धाव घेऊन उपाययोजना करीत मूर्ती मार्गस्थ केली. खोदलेल्या रस्त्यांमुळे काही ठिकाणी मंडळांना मंडप टाकण्यासाठी जागा नाही. त्यामुळे महानगरपालिकेने नाशिककरांना वेठीस न धरता युद्ध पातळीवर खड्ड्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नाशिक सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने केली आहे.

खड्डेमय नाशिकचा विषय तीन महिन्यांपासून गाजत आहे. कुंभमेळ्यासाठी एकाचवेळी हाती घेतलेली रस्त्यांची कामे, उपयोगिता सेवांसाठी सर्वत्र खोदकामे आणि पावसाळ्यात रस्त्यांवरील यामुळे अपघात घडत असून काही जणांना प्राण गमवावे लागले. तर अनेक जण जायबंदी झाले. दरम्यानच्या काळात महापालिकेने खड्डे दुरुस्तीचे काम हाती घेतले असले तरी खड्ड्यांचा विषय पूर्णत मार्गी लागलेला नाही. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. रात्री गंगापूर रस्त्यावरील पंपिग स्टेशन परिसरात गणेश मूर्ती घेऊन जाणाऱ्या ट्रॉलीचे चाक खड्ड्यात अडकले. या घटनेची माहिती समजल्यानंतर आम्ही धाव घेऊन मदतकार्य केले. आवश्यक उपाययोजना करून नंतर ही मूर्ती मार्गस्थ करण्यात आल्याचे नाशिक सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेट्ये यांनी सांगितले.

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीत अनेक अडचणी येत आहेत. या संदर्भात मनपा आयुक्तांची भेट घेतली जाणार आहे. महापालिकेने खड्डे लवकरात लवकर न बुजवल्यास मंडळांना अखेरीस खड्ड्यात गणपती बसवावा लागेल, असा इशारा गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेट्ये यांनी दिला. खोदकाम व खड्ड्यांमुळे अनेक मंडळांना मंडप टाकताना अडचणी निर्माण होत आहेत. खड्ड्यांमुळे १० मंडळांना मंडप उभारणे अशक्य झाले आहे. गणेशोत्सवात भाविकांनाही खड्ड्यांमधून मार्गक्रमण करावे लागेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande