वर्धा जिल्ह्यात एकही गोविंदा पथक नाही
वर्धा, 05 सप्टेंबर (हिं.स.) बाहेर जिल्ह्यातील पथकांच्या जोरावर रंगतो वर्ध्यात दहीहंडीचा थरार गोकुळाष्टमी येताच सर्वत्र दहीहंडीचा थरार अनुभवण्याकरिता नागरिकांकडून गर्दी होते. थरावर थर, त्यावर पाण्याचा मारा. यात उंचावर पोहोचणारे हात दहीहंडी फोडतात
वर्धा जिल्ह्यात एकही गोविंदा पथक नाही


वर्धा, 05 सप्टेंबर (हिं.स.)

बाहेर जिल्ह्यातील पथकांच्या जोरावर रंगतो वर्ध्यात दहीहंडीचा थरार

गोकुळाष्टमी येताच सर्वत्र दहीहंडीचा थरार अनुभवण्याकरिता नागरिकांकडून गर्दी होते. थरावर थर, त्यावर पाण्याचा मारा. यात उंचावर पोहोचणारे हात दहीहंडी फोडतात त्याचा आनंद काही न्याराच असतो. वर्ध्यात दहीहंडी नाही असे नाही, मात्र या दहीहंडीची हंडी फोडण्याकरिता वर्ध्यात गोविंदा पथकच नाही. बाहेर जिल्ह्यातील गोविंदांवरच वर्ध्यातील दहीहंडीची मदार आहे. बजरंग दलाच्या वतीने वर्ध्यात वर्ष २००७ मध्ये दहिहंडीच्या आयोजनाचा प्रारंभ करण्यात आला. शास्त्री चौक येथे दहीहंडीची ही परंपरा आजही कायम आहे. वर्धेनंतर देवळी, आणि आर्वी येथेही दहीहंडी स्पर्धा आयोजित करण्यात आली. यातील देवळीचे आयोजन बाद झाले. तर वर्धा आणि आर्वी येथे दहीहंडी स्पर्धा कायम आहे. या दोनही ठिकाणी वर्ध्यातील अनुप जयस्वाल यांचे मार्गदर्शन असते. वर्ध्यात होत असलेल्या आयोजनात प्रारंभीच्या काळात बजरंग दल एकत्र होता. त्यामुळे आयोजन मोठे होते. आजही आयोजनाची भव्यता कायम आहे. येथे अनुप जयस्वाल यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आजही लक्षवेधी ठरते. आयोजनाच्या प्रारंभीच्या काळात बजरंग दलाचे कार्यकर्तेच ही दहीहंडी फोडायचे. त्यानंतर बजरंग दलाच्याच पदाधिकाऱ्यांनी सेलसुरा, देवळी, एमआयडीसी परिसरात वास्तव्यास असलेल्या काठीयावाडी गोपालकांच्या चमू तयार केल्या. त्यांच्या माध्यमातून स्पर्धा होवू लागली. नंतरच्या काळात बजरंग दलाचे विभाजन झाले आणि चमू मोडकळीस आली. परंतु, स्पर्धा सुरूच होती. याच काळात २०१० मध्ये येथील स्पर्धेत अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथील चमू आली. काही काळ सतत याच चमूने पारितोषिक पटकावले. त्यानंतर अमरावती, नागपूर, भंडारा जिल्ह्यातील पथकाने यात प्रवेश केल्याने ही दहीहंडी स्पर्धा जिल्ह्याच्या बाहेर पोहोचली. पण, या स्पर्धेत जिल्ह्यातील एकही पथक नसल्याची खंत आजही कायम आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande