
वर्धा, 05 सप्टेंबर (हिं.स.)। येथील पोलिस ठाणे चांगलेच चर्चेत आले आहे. आरोपी पकडण्याकरिता गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर झालेला हल्ला, एकापाठोपाठ झालेल्या चोऱ्या चर्चेत असतानाच येथे दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे पुढे आले आहे. या कर्मचाऱ्यांनी वाळूचे वाहन सोडविण्याकरिता ५० हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे. चौकशीनंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सदर माहिती नुसार चंद्रपूर जिल्ह्यातील वाळू व्यावसायिकाची गाडी पकडून ती समुद्रपूर पोलिस हद्दीत दाखवून गाडी सोडवण्याकरिता ५० हजार रुपयाची मागणी केली. त्या व्यावसायिकाने सदर मुद्देमाल हा माझ्याच मालकीचा आहे असे सांगून सुद्धा समुद्रपूर येथील पोलिस राहुल साठे नामक कर्मचाऱ्याने ५० हजाराची मागणी केली. त्यामुळे व्यावसायिक हतबल होऊन ३० हजार रुपये रोख व १० हजार ऑन लाइन असे ४० हजार रुपये दिले. १० हजार समुद्रपूर येथील दुसरा कर्मचारी सुमीत भुते याला दिल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे या दोन पोलिस कर्मचार्यांवर करवाई करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षकांकडून सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी पोलिस कर्मचारी प्रकाश मैद यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी रेणकापूर येथील घटना स्थळाला व तसेच समुद्रपूर पोलिस ठाण्याला भेट दिली. पोलिस कर्मचारी व शहरात होत असलेल्या घटना याची जबाबदारी पोलिस ठाण्याच्या अधिकार्यांवर असून वरिष्ठांनी याकडेही लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी