
धाराशिव, 05 सप्टेंबर (हिं.स.)।
शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला भेट देऊन उपोषणकर्त्या शिक्षकांशी संवाद साधला व त्यांच्या मागण्या, अडचणी आणि शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या प्रश्नांची माहिती जाणून घेतली..
शिक्षक हे समाजाचे मार्गदर्शक आणि भावी पिढी घडविणारे घटक आहेत. मात्र, ज्या दिवशी समाज शिक्षकांचा सन्मान करतो, त्याच शिक्षकांना आपल्या न्याय्य मागण्यांसाठी उपोषणाचे अस्त्र हाती घ्यावे लागते ही व्यवस्थेची गंभीर चूक असून शासनासाठी लाजिरवाणी बाब आहे..
त्यांच्या मागण्यांसंदर्भात शासन दरबारी आवाज उठवून प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार पाटील यांनी दिले..
शिक्षकांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या या लढ्यात त्यांना एकटे सोडणार नाही. शिक्षकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला तर तो आवाज अधिक बुलंद करण्यासाठी आपण त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू, असा विश्वास यावेळी दिला..
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis