सेलूच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार- पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
परभणी, 05 सप्टेंबर (हिं.स.)। सेलू शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. शहर स्वच्छ, सुंदर, आधुनिक आणि नागरिकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणारे बनविण्यावर विशेष भर दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
सेलूच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार-   पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची ग्वाही


परभणी, 05 सप्टेंबर (हिं.स.)।

सेलू शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. शहर स्वच्छ, सुंदर, आधुनिक आणि नागरिकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणारे बनविण्यावर विशेष भर दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली. सेलू येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या नूतन इमारतीसह शासकीय निवासस्थान इमारतीचा लोकार्पण सोहळा शनिवार 5 सप्टेंबर रोजी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमास नगराध्यक्ष मिलिंद सावंत, उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय जाधव यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असून विविध क्षेत्रांत जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातही विकासकामांना नवी गती मिळाली आहे. दळणवळण, आरोग्य, शिक्षण तसेच सार्वजनिक सुविधांची कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाली पाहिजेत, ही शासनाची भूमिका आहे. त्याच धर्तीवर सेलू शहराचाही सर्वांगीण आणि आधुनिक विकास करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जातील.आगामी काळात सेलू शहरात विविध महत्त्वाची विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. भूमिगत मलनिस्सारण व्यवस्था, गॅस पाइपलाइन यांसारख्या सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच शहरातील शासकीय कार्यालयांच्या इमारती आधुनिक आणि नागरिकांसाठी अधिक सुविधायुक्त करण्याचे नियोजन करण्यात येईल. प्रत्येक शासकीय कार्यालयाला आयएसओ मानांकन मिळावे, या दृष्टीनेही आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी सांगितले. स्वच्छता आणि विकासाच्या माध्यमातून सेलू शहराला मराठवाड्यातील एक सुंदर आणि आदर्श शहर बनविण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून प्रत्येक नागरिकाचीही आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छतेला प्राधान्य देऊन शहर कायम स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री बोर्डीकर यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande