

* आशिया कपमध्ये भारताची विजयाची हॅटट्रिक
* आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट इतिहासात हरमनप्रीत कौरच्या नावावर विक्रम; ठरली जगातील पहिलीच कर्णधार
दुबई, ५ सप्टेंबर (हिं.स.) : अत्यंत चुरशीच्या झालेल्या महिला आशिया कप 2026 (Women's Asia Cup 2026) स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर (India vs Pakistan) 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सामना खेळवला गेला.
या हायव्होल्टेज सामन्यात नाणेफेकीसाठी मैदानात पाऊल ठेवताच भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नावावर एका अभूतपूर्व जागतिक विक्रमाची नोंद झाली आहे. पुरुष आणि महिला अशा दोन्ही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट इतिहासात १५० सामन्यांत नेतृत्व करणारी ती जगातील पहिलीच कर्णधार ठरली आहे. क्रिकेट जगतात आजवर कोणत्याही दिग्गजाला हा पल्ला गाठता आलेला नाही.
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानकडून एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही आणि संपूर्ण संघ अवघ्या 55 धावांवर ऑलआउट झाला. या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने सामना सहज जिंकत स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. भारताने हा सामना 7 गडी राखून जिंकला. याआधी भारताने थायलंड आणि हाँगकाँगच्या महिला संघांचाही एकतर्फी पराभव केला होता.
डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या मुनीबा अलीने 15 चेंडूंमध्ये 13 आणि शवाल जुल्फिकारने 14 चेंडूंमध्ये 14 धावा केल्या आणि त्या बाद झाल्या. भारतीय गोलंदाजांसमोर या खेळाडूंना काहीही विशेष करता आले नाही. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या गुल फिरोझाने 4 चेंडू खेळले, पण ती शून्यावर माघारी परतली. दुसरीकडे, आयशा जफर 7 चेंडूंमध्ये 2 धावा करून बाद झाली. सदाफ शमास आणि कर्णधार फातिमा सना यांनीही खराब कामगिरी केली.
भारताकडून श्री चरणी आणि क्रांती गौड यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. चरणीने 4 षटकांत केवळ 7 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तसेच प्रेमा रावतने 4 षटकांत 9 धावा खर्च करून 3 विकेट्स घेतल्या. भारताकडून शेफाली वर्माने 1 आणि दीप्ती शर्माने 2 गडी बाद केले.
अवघ्या 55 धावांचे आव्हान भारताने केवळ 8.4 षटकांतच लक्ष्य गाठले. भारताकडून शेफाली वर्माने 6 चेंडूंमध्ये 12 धावांची खेळी केली, तर स्मृती मानधनाने 11 चेंडूंमध्ये 9 धावा केल्या. तसेच प्रतिका रावल 3 चेंडूंमध्ये 4 धावा करून बाद झाली. भारताचे सुरुवातीलाच 3 खेळाडू लागोपाठ बाद झाले, पण लक्ष्य छोटे असल्यामुळे भारताला विजयासाठी कोणतीही अडचण आली नाही. हरमनप्रीत कौरने 18 चेंडूंमध्ये 18 आणि दीप्ती शर्माने 14 चेंडूंमध्ये 12 धावांची नाबाद खेळी केली. अशा प्रकारे भारताने पाकविरुद्ध वर्चस्व राखून हा सामना 7 विकेट्सने जिंकला आहे.
टॉस गमावल्यानंतर १५० व्या सामन्याच्या विक्रमावर बोलताना हरमनप्रीत म्हणाली, हा नक्कीच एक मोठा आणि अभिमानास्पद टप्पा आहे. परंतु, मैदानात जाऊन खेळाचा मनमुराद आनंद घेणे हे माझ्यासाठी नेहमीच सर्वात महत्त्वाचे राहिले आहे. पाकिस्तानला कमीत कमी धावसंख्येत रोखून लक्ष्याचा सहज पाठलाग करण्याचे भारताचे ध्येय असून भारतीय प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
हरमनप्रीत कौरने २०१२ मध्ये पहिल्यांदा भारतीय संघाच्या टी-२० कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. तेव्हापासून तिने आपल्या आक्रमक आणि कणखर नेतृत्वाच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेटला नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. तिच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या आधीच्या १४९ टी-२० सामन्यांपैकी भारताने तब्बल ८७ सामन्यांत दणदणीत विजय मिळवला आहे, तर ५७ सामन्यांत पराभव पत्करावा लागला आणि ५ सामने अनिर्णित राहिले आहेत.
महिला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यांत नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत हरमनप्रीत कौर आता १५० सामन्यांसह निर्विवादपणे पहिल्या स्थानी विराजमान झाली आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर श्रीलंकेची चामरी अटापट्टू (१२१ सामने) असून, ऑस्ट्रेलियाची माजी महान कर्णधार मेग लॅनिंग (१०० सामने) तिसऱ्या स्थानावर आहे. तर इंग्लंडची हीदर नाइट (९६ सामने) आणि रवांडाची डायने बिमेनीमाना (९६ सामने) यांच्या नावाचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी