
कोलंबो, 05 सप्टेंबर (हिं.स.)श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांचे ज्येष्ठ पुत्र नमाल राजपक्षे यांना लाच घेतल्याच्या आरोपाखाली भ्रष्टाचारविरोधी संस्था सीआयएबीओसीने अटक केली आहे. श्रीलंकन एअरलाइन्ससाठी एअरबस विमाने खरेदी करण्याकरिता लाच घेतल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. नमाल राजपक्षे यांना सीआयएबीओसीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले होते. अटक करून कोलंबोच्या न्यायाधीशांसमोर हजर करण्यापूर्वी त्यांची सुमारे पाच तास चौकशी करण्यात आली.
कोलंबोच्या मुख्य न्यायाधीशांनी त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आणि नमाल यांना दोन आठवड्यांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तपास यंत्रणांनुसार, एका युरोपियन विमान उत्पादकाकडून मिळालेली लाच सिंगापूरमधील बँक खात्यांमार्फत नमाल यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आली होती.
सीआयएबीओसीनुसार, २०१३ मध्ये हा करार मिळवून देण्याच्या बदल्यात युरोपियन विमान उत्पादकाकडून ८००,००० डॉलर्सची लाच घेतल्याचा आरोप नमालवर आहे. तपासात असे उघड झाले की, एका श्रीलंकन व्यावसायिकाने सिंगापूरमधील दोन बँक खात्यांमार्फत नमालकडे ही रक्कम हस्तांतरित करण्याची व्यवस्था केली होती.
चौकशीनंतर, भ्रष्टाचारविरोधी अधिकाऱ्यांनी नमाल राजपक्षे यांना न्यायालयात हजर केले, जिथे त्यांचे वकील निशांत दयानंद यांनी दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळण्यात आला. कोलंबोचे मुख्य दंडाधिकारी असंगा बोदरागामा यांनी राजपक्षे घराण्याच्या या ४० वर्षीय वारसदाराला पुढील तपास होईपर्यंत दोन आठवड्यांची न्यायालयीन कोठडी सुनावण्याचे आदेश दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे