विद्यार्थ्यांनाही दररोज २०० मिली फ्लेवर मिल्क द्या : परभणी राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
परभणी, 07 सप्टेंबर (हिं.स.)। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने शासकीय वसतिगृह व निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना दररोज २०० मिली फ्लेवर मिल्क उपलब्ध करून देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, या योजनेचा विस्तार करून राज्यातील सर्व जिल्
विद्यार्थ्यांनाही दररोज २०० मिली फ्लेवर मिल्क द्या : परभणी राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


परभणी, 07 सप्टेंबर (हिं.स.)।

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने शासकीय वसतिगृह व निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना दररोज २०० मिली फ्लेवर मिल्क उपलब्ध करून देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, या योजनेचा विस्तार करून राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनाही दररोज २०० मिली फ्लेवर मिल्क उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. ग्रामीण व दुर्गम भागातील मोठ्या संख्येने विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमधून शिक्षण घेतात. त्यातील अनेक विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या मर्यादित कुटुंबातील आहेत. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्य व पोषणाची काळजी घेणे आवश्यक आहे. सकस व पौष्टिक आहारामुळे विद्यार्थ्यांची निरोगी वाढ, एकाग्रता आणि शैक्षणिक प्रगतीला मदत होऊ शकते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पोषणाच्या गरजा समान असल्याची भूमिका

शासकीय वसतिगृह किंवा निवासी शाळेतील विद्यार्थी आणि जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पोषणाच्या मूलभूत गरजा वेगळ्या नाहीत. त्यामुळे शाळेचा प्रकार कोणताही असो, प्रत्येक विद्यार्थ्याला समान पोषण सुविधा मिळणे आवश्यक आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निर्णयाच्या धर्तीवर जिल्हा परिषद शाळांमध्येही फ्लेवर मिल्क योजना लागू करावी, अशी मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरील खर्च हा भविष्यातील सक्षम महाराष्ट्रासाठीची गुंतवणूक आहे. निरोगी शरीर, योग्य पोषण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांचा परस्पर संबंध लक्षात घेता या योजनेचा विस्तार ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत करणे महत्त्वाचे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना दररोज २०० मिली फ्लेवर मिल्क देण्यासाठी स्वतंत्र शासन निर्णय काढून योजना राज्यभर लागू करावी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, असा आग्रह निवेदनातून करण्यात आला आहे.निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, जिल्हा परिषद सदस्य संग्राम जामकर, युवक प्रदेश उपाध्यक्ष किरण तळेकर, युवक जिल्हाध्यक्ष रोहन सामाले, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सुमंत वाघ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande