मध्यस्थीत संवाद आणि समजूतदारपणाला महत्त्व — न्या. अंजू शेंडे
पुणे, ७ सप्टेंबर (हिं.स.)। न्यायप्रक्रियेकडे केवळ विजय किंवा पराभवाच्या दृष्टिकोनातून न पाहता पक्षकारांचे म्हणणे समजून घेणे, त्यांच्या भावना जाणून घेणे आणि संवादाच्या माध्यमातून मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. मध्यस्थी प्रक्रियेत संवाद,
मध्यस्थीत संवाद आणि समजूतदारपणाला महत्त्व — न्या. अंजू शेंडे


पुणे, ७ सप्टेंबर (हिं.स.)। न्यायप्रक्रियेकडे केवळ विजय किंवा पराभवाच्या दृष्टिकोनातून न पाहता पक्षकारांचे म्हणणे समजून घेणे, त्यांच्या भावना जाणून घेणे आणि संवादाच्या माध्यमातून मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. मध्यस्थी प्रक्रियेत संवाद, समजूतदारपणा आणि प्रेमळपणाला विशेष महत्त्व आहे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू ए. एस. शेंडे यांनी केले.शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील अशोका हॉल येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे आणि पुणे बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

कार्यक्रमास सेवानिवृत्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिरीषकुमार हाडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती आर. देशपांडे तसेच पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. काळूराम बबन भुजबळ उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना अंजू शेंडे म्हणाल्या की, मध्यस्थी प्रक्रियेत पक्षकारांचे म्हणणे आणि त्यांच्या भावनांचा विचार करून संवादाच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. मध्यस्थी प्रक्रियेसाठी संभाषणकौशल्य महत्त्वाचे असून, मध्यस्थाने योग्य संतुलन राखणे गरजेचे आहे. मध्यस्थाने स्वतःची निर्णायक भूमिका न घेता पक्षकारांना परस्पर संमतीने तोडगा काढण्यासाठी मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सेवानिवृत्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिरीषकुमार हाडे यांनी मध्यस्थी प्रक्रियेची कार्यपद्धती, मध्यस्थाची भूमिका तसेच मध्यस्थीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती आर. देशपांडे यांनी मध्यस्थी प्रक्रिया राबविताना येणाऱ्या विविध अडचणी आणि त्या दूर करण्यासाठी आवश्यक बाबींबाबत माहिती दिली. तसेच १२ सप्टेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. काळूराम बबन भुजबळ यांनीही सर्व वकिलांनी मध्यस्थी प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पक्षकारांना त्वरित आणि समाधानकारक न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

-------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande