
चेन्नई, 07 सप्टेंबर (हिं.स.)ईशान किशनच्या २७० धावांच्या जोरावर ईस्ट झोनने पहिल्या डावात ७०८ धावांचा डोंगर उभा केला. त्याच्या प्रथम-श्रेणी कारकिर्दीतील हे दुसरे द्विशतक आणि दुलीप ट्रॉफीमधील पहिले द्विशतक होते. किशनसोबतच कुमार कुशाग्रनेही शतक झळकावले आणि संघाला ही धावसंख्या गाठण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
किशनला त्रिशतक करण्याची एक उत्तम संधी मिळाली होती, पण ती त्याच्या हातून निसटली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत, ईस्ट झोनने ४ गडी गमावून ३८५ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी, ईस्ट झोनच्या फलंदाजांनी साऊथ झोनच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. आणि पहिल्या दिवसाप्रमाणेच त्यांची धुलाई केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ईस्ट झोनचा संघ ७०८ धावांवर सर्वबाद झाला.
पहिल्या दिवसाचा खेळ संपता संपता इशानने शतक पूर्ण केले होते. दुसऱ्या दिवशीही त्याने शानदार फलंदाजी करत २७० धावा केल्या. आपल्या प्रथम-श्रेणी क्रिकेट कारकिर्दीत त्रिशतक झळकावण्याची इशानला पहिलीच संधी मिळाली होती, पण त्याचे स्वप्न भंगले. इशानने ३३४ चेंडूंमध्ये ३० चौकार आणि ७ षटकारांसह २७० धावा केल्या. या काळात त्याचा स्ट्राईक रेट ८०.८४ होता.
किशन व्यतिरिक्त, कुमार कुशाग्रनेही साऊथ झोनच्या गोलंदाजांना चांगलेच धारेवर धरले. त्याने आक्रमक फलंदाजी करत शतक झळकावले. कुशाग्रने १३२ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ५ षटकारांसह १०१ धावा केल्या. ईस्ट झोनच्या तळाच्या फलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. अनुकूल रॉयने ४५ धावा, मोहम्मद कौनियान कुरेशीने ४० धावा आणि मोहम्मद शमीने २८ धावा केल्या. दक्षिण विभागासाठी त्रिपुराना विजय हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने चार बळी घेतले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पूर्व विभागाने ७०८ धावा केल्या होत्या. आता तिसऱ्या दिवशी सर्वांचे लक्ष साऊथ झोनच्या फलंदाजांच्या कामगिरीवर असेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे