मार्क कोल्स यांची झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती
हरारे, ७ सप्टेंबर (हिं.स.) । झिम्बाब्वे क्रिकेटने मार्क कोल्स यांची महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. ही नियुक्ती एका कठोर निवड प्रक्रियेनंतर करण्यात आली आहे. कोल्स हे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी पाच सामन्य
झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघ


हरारे, ७ सप्टेंबर (हिं.स.) । झिम्बाब्वे क्रिकेटने मार्क कोल्स यांची महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. ही नियुक्ती एका कठोर निवड प्रक्रियेनंतर करण्यात आली आहे. कोल्स हे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेची जबाबदारी सांभाळतील अशी अपेक्षा आहे. ही दोन्ही देशांच्या महिला संघांमधील पहिली आंतरराष्ट्रीय मालिका असेल.

न्यूझीलंडचे रहिवासी असलेल्या कोल्स यांनी यापूर्वी पाकिस्तान आणि स्कॉटलंडच्या महिला संघांचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. त्यांनी स्कॉटलंडच्या पुरुष संघासोबत सहायक प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. त्यांनी क्रिकेट पापुआ न्यू गिनीसाठी उच्च-कार्यक्षमता व्यवस्थापक आणि ऑस्ट्रेलियामध्ये प्रशिक्षण सल्लागार म्हणूनही काम केले आहे.

झिम्बाब्वे क्रिकेटचे अध्यक्ष तावेंग्वा मुकुहलानी म्हणाले की, मार्क कोल्स यांच्याकडे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण आणि उच्च-स्तरीय कामगिरीचा व्यापक अनुभव आहे. त्यांना महिला क्रिकेटच्या गरजा आणि आव्हानांचीही चांगली जाण आहे. आम्हाला खात्री आहे की, वरिष्ठ आणि १९ वर्षांखालील स्तरावर नियुक्त केलेल्या तांत्रिक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसोबत मिळून, ते एक स्पर्धात्मक संघ तयार करण्यास आणि दीर्घकालीन यशाचा स्पष्ट मार्ग स्थापित करण्यास मदत करतील.

ते पुढे म्हणाले की, आम्हाला खात्री आहे की हा गट झिम्बाब्वेच्या महिला क्रिकेटला पुढे नेण्यास आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जोरदार स्पर्धा करण्यास मदत करेल.कोल्स यांच्यासोबत रंगारिराई मान्यंदे फलंदाजी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून आणि ट्रेव्हर फिरी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून सामील होतील. झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला सामना ११ सप्टेंबर रोजी बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळला जाईल. मालिकेतील सर्व पाच सामने याच मैदानावर खेळवले जाणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande