
लातूर, 8 सप्टेंबर (हिं.स.) : नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या निर्देशानुसार विशेष पथकाने लातूर जिल्ह्यात कारवाई सुरू केली आहे. या पथकाने निलंगा शहरातील बँक कॉलनी परिसरातील मटका बुकीवर धाड टाकून सहा जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत रोख रकमेसह पाच मोबाईल आणि संगणक साहित्य असा एकूण 1 लाख 18 हजार 290 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस ठाणे निलंगा हद्दीतील बँक कॉलनी परिसरात विशेष पथकाने मटका बुकीवर छापा टाकला. यावेळी 26 हजार 90 रुपये रोख, 47 हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल तसेच 45 हजार 200 रुपये किमतीचे संगणक साहित्य असा एकूण 1 लाख 18 हजार 290 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 334/2026 दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र जुगार कायद्यातील कलम 12 (अ) अन्वये हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस हवालदार प्रदीप खानसोळे, गणेश राठोड आणि गजानन डवरे यांनी सहभाग घेतला.
विशेष पथकाच्या या कारवाईबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी आणि अंमलदारांचे अभिनंदन केले. तसेच अवैध व्यवसायांविरोधातील कारवाई यापुढेही प्रभावीपणे सुरू ठेवण्याबाबत त्यांनी पथकाला प्रोत्साहित केले.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis