
पॅरिस, 08 सप्टेंबर (हिं.स.)।फ्रान्समधील प्रसिद्ध आयफेल टॉवर सोमवारी काही काळासाठी बंद ठेवण्यात आला आणि तो उघडण्यास विलंब झाला. कर्मचाऱ्यांनी केलेल्या निषेध आंदोलनामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की, शनिवारी हिंदू धार्मिक संस्था बीएपीएसशी संबंधित सुमारे १०० जणांच्या खासगी दौऱ्यादरम्यान महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यस्थळावरून हटण्यास सांगण्यात आले, जेणेकरून त्यांच्या जागी पुरुष कर्मचारी उभे राहू शकतील.या घटनेमुळे आयफेल टॉवरच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली. हे प्रकरण समोर आल्यानंतर फ्रान्समधील वरिष्ठ राजकारण्यांनीही त्यावर टीका केली आहे. पॅरिस प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
युनियनच्या प्रतिनिधी डायने डावोइन यांनी वृत्तसंस्थाला सांगितले की, शिष्टमंडळ जात असताना महिला कर्मचाऱ्यांना त्यांचे कार्यस्थळ सोडण्यास सांगण्यात आले, जेणेकरून पुरुष कर्मचारी त्यांच्या जागी काम करू शकतील. डावोइन यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेनंतर संपूर्ण सप्ताहअखेरीस कर्मचाऱ्यांमध्ये तणाव वाढत राहिला. त्यानंतर सोमवारी सकाळी कर्मचाऱ्यांनी बैठक घेण्याचा निर्णय घेतला. या बैठकीचे दोन प्रमुख उद्देश होते. पहिला म्हणजे व्यवस्थापनाशी या मुद्द्यावर चर्चा करणे आणि दुसरा म्हणजे भविष्यात कंपनीमध्ये महिलांशी अशा प्रकारची वागणूक पुन्हा होऊ नये, याची खात्री करणे. कर्मचाऱ्यांच्या बैठकीमुळे आयफेल टॉवर पर्यटकांसाठी खुला करण्यास विलंब झाला. डावोइन यांनी सांगितले की, व्यवस्थापनाने या घटनेबद्दल कर्मचाऱ्यांची माफीही मागितली आहे.
दुसरीकडे, बीएपीएसने सांगितले की, शिष्टमंडळाचा दौरा आयफेल टॉवरच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून निश्चित करण्यात आला होता. संस्थेच्या म्हणण्यानुसार, सामान्य पर्यटकांना कमीत कमी त्रास व्हावा आणि स्मारकात नेहमीप्रमाणे प्रवेश सुरू राहावा, हा त्यामागचा उद्देश होता. बीएपीएसने ‘एक्स’वर जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, सुमारे १०० जणांच्या मोठ्या शिष्टमंडळाचा आयफेल टॉवरचा दौरा व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर, टॉवर नियमितपणे उघडण्याच्या वेळेच्या सुरुवातीलाच निश्चित करण्यात आला होता. सामान्य नागरिकांना कमीत कमी गैरसोय व्हावी, यासाठी ही वेळ निवडण्यात आली होती, असे संस्थेने स्पष्ट केले.
दौऱ्यादरम्यान कोणत्याही पर्यटकाला आयफेल टॉवरमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आल्याची कोणतीही घटना आपल्याला माहीत नसल्याचेही संस्थेने सांगितले.मात्र, या संपूर्ण वादाबद्दल बीएपीएस ने खेद व्यक्त केला आहे. तसेच, या परिस्थितीमुळे कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावल्या असतील किंवा कोणाला गैरसोय झाली असेल, तर त्याबद्दल मनापासून माफी मागत असल्याचे संस्थेने म्हटले आहे.
या प्रकरणी पॅरिसचे महापौर इमॅन्युएल ग्रेगोआर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. आयफेल टॉवरच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेल्या चिंता योग्य असून त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आयफेल टॉवरचे संचालन करणाऱ्या एसईटीई कंपनीने मान्य केले की, शिष्टमंडळाकडून दौऱ्याची अशी व्यवस्था करण्याची विनंती करण्यात आली होती, ज्यामुळे महिलांशी कमीत कमी संवाद होईल. मात्र, अशा प्रकारच्या अटी स्वीकारायला नको होत्या, हेही एसईटीई ने मान्य केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode