
काठमांडू , 07 सप्टेंबर (हिं.स.)।नेपाळमध्ये पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. आतापर्यंत या आपत्तीत 1,355 जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे 5,000 जण अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळ सरकारने सोमवारी, 7 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय शोकदिन पाळण्याचा निर्णय घेतला असून, देशभर सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. 26 ऑगस्ट रोजी आलेल्या भीषण पुरामुळे हजारो नागरिक बेघर झाले, तर आतापर्यंत हजारो मृतदेह सापडले आहेत.
या नैसर्गिक आपत्तीतील मृतांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यासाठी नेपाळमधील विविध ठिकाणी श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात आले.बिहार-नेपाळ सीमेवरील रक्सौललगत असलेल्या वीरगंज महानगरपालिकेच्या घंटाघर चौकातही श्रद्धांजली सभा घेण्यात आली. यावेळी दिवंगतांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी दीपप्रज्वलन करण्यात आले.
नेपाळमधील या भीषण आपत्तीला आता 13 दिवस पूर्ण झाले आहेत. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार, एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतरचा 13वा दिवस हा शोककाळातील महत्त्वाचा दिवस मानला जातो. नेपाळच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी देशभरातील सरकारी कार्यालयांमध्ये तसेच परदेशातील नेपाळी राजनैतिक मिशनमध्ये राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर झुकवण्यात आला आहे.
नेपाळमध्ये आलेल्या या आपत्तीमुळे घरे, रस्ते, पूल, जलविद्युत प्रकल्प आणि इतर पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.सर्वाधिक नुकसान झालेल्या भागांमध्ये शोध आणि बचावकार्य अद्याप सुरू आहे. जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्येही शोधमोहीम राबवली जात आहे. बोगद्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्याला वेग देण्यात आला आहे. नेपाळमध्ये तैनात भारतीय लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि सीमा रस्ते संघटना (बीआरओ) पर्यायी मार्ग तयार करण्याचे कामही करत आहेत.
नेपाळमध्ये बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दल आणि बचाव पथके सातत्याने मोहीम राबवत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, या आपत्तीमुळे किमान 32,000 कुटुंबे विस्थापित झाली आहेत. तर 7,500 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. या नैसर्गिक आपत्तीचा नागरिकांच्या उपजीविकेवर तसेच आवश्यक पायाभूत सुविधांवरही मोठा परिणाम झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode