
लातूर, 08 सप्टेंबर (हिं.स.) मराठवाड्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पाण्याअभावी शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पिकांचे नुकसान होत असताना शेतकऱ्यांसमोर मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरखर्च आणि रेशनचा प्रश्नही उभा ठाकला आहे.
या अडचणीच्या काळात राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना तातडीने विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज देशमुख यांनी केली आहे.
शेतकरी सरकारकडे आशेने पाहत असून, त्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे. दुष्काळामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याबरोबरच त्यांच्या दैनंदिन गरजांकडेही सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, असे देशमुख यांनी म्हटले.
दरम्यान, धीरज देशमुख यांची भेट घेतल्यानंतर एका आजीबाईंना अश्रू अनावर झाले. रेशन मिळत नसल्याची खंत त्यांनी देशमुख यांच्यासमोर व्यक्त केली. त्यांच्या व्यथेने ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबांसमोरील अडचणींचे गांभीर्य पुन्हा एकदा समोर आले.
दुष्काळग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना शासनाकडून तातडीची मदत मिळावी, यासाठी सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis