पेपरफुटीवरून एमपीएससी उमेदवारांचे आंदोलन; रोहिणी खडसेंची सरकारवर टीका
जळगाव, ८ सप्टेंबर (हिं.स.) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरून पुण्यात हजारो एमपीएससी उमेदवारांनी आंदोलन केले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)च्या महिला प्रदेश
पेपरफुटीवरून एमपीएससी उमेदवारांचे आंदोलन; रोहिणी खडसेंची सरकारवर टीका


जळगाव, ८ सप्टेंबर (हिं.स.) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरून पुण्यात हजारो एमपीएससी उमेदवारांनी आंदोलन केले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)च्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. पुण्यात विद्यार्थ्यांनी काढलेला मोर्चा हा सरकारच्या कारभारातील अपयशाचे द्योतक असल्याची टीका त्यांनी केली.

एमपीएससीच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबातील तरुणांची संख्या मोठी आहे. मुलांच्या शिक्षणासाठी काही पालकांनी जमीन विकली, तर काहींनी कर्ज काढून शिक्षणाचा खर्च भागविला. अशा परिस्थितीत परीक्षांमध्ये कथित पेपरफुटीसारखे प्रकार घडल्यास विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीवर पाणी फेरले जाते, अशी भावना रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली.

एमपीएससीच्या परीक्षांमध्ये वारंवार गैरप्रकार होत असल्याने उमेदवारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची सरकारने तातडीने दखल घेऊन त्यांच्या मागण्यांवर चर्चा करावी, अशी मागणी खडसे यांनी केली.

'सरकारला जनाची नाही, मनाची तरी असेल तर या आंदोलनाकडे दुर्लक्ष न करता तातडीने हालचाली कराव्यात,' अशा शब्दांत त्यांनी सरकारला इशारा दिला.

कथित पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो उमेदवारांच्या भवितव्यावर परिणाम होत असल्याचा आरोप करत एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिव यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणीही रोहिणी खडसे यांनी केली.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande