कोराडीतील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाला शासकीय जमीन देण्यास मान्यता
मुंबई, 08 सप्टेंबर, (हिं.स.) नागपूर येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात विकसित करण्यात आलेल्या शासकीय जमिनी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानला नाममात्र दराने भाडेतत्त्वावर देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थ
कोराडीतील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाला शासकीय जमीन देण्यास मान्यता


मुंबई, 08 सप्टेंबर, (हिं.स.) नागपूर येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात विकसित करण्यात आलेल्या शासकीय जमिनी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानला नाममात्र दराने भाडेतत्त्वावर देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

कोराडीतील या जमिनीवर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार बांधकामे करण्यात आली असून या सर्वांचे व्यवस्थापन श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान यांच्याकडून केले जाते. या ठिकाणी भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासह स्वच्छता, वीज, पाणी, सुरक्षा आदी बाबींसाठी संस्थानला खर्च करावा लागतो. या जमिनी शासनाकडे असल्याने त्यावर होणारा खर्च संस्थेला ताळेबंदात दाखविणे अशक्य होते. यास्तव, संस्थानाने प्रभावी व नियोजनबध्द व्यवस्थापन तसेच देखभाल दुरूस्तीसाठी या जमिनी 30 वर्षांच्या कालावधीकरिता भाडेतत्त्वावर मिळाव्यात, अशी मागणी केली होती. त्यानुसार शासनाच्या प्रचलित वार्षिक भाडेपट्टा आकारणी तत्त्वानुसार या जमिनी देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande