अमरावती : नरभक्षक वाघिणीच्या मृत्यूचे गूढ कायम; अंतिम अहवालाची प्रतीक्षा
अमरावती, ८ सप्टेंबर (हिं.स.) : अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून दहशत निर्माण करून चार नागरिकांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीला वन विभागाने अखेर जेरबंद केले. मात्र, जेरबंदीनंतर उपचार सुरू असताना सोमवारी (७ सप्टेंबर) सायंकाळी तिचा
४ जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीचा जेरबंद केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू


अमरावती, ८ सप्टेंबर (हिं.स.) : अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून दहशत निर्माण करून चार नागरिकांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीला वन विभागाने अखेर जेरबंद केले. मात्र, जेरबंदीनंतर उपचार सुरू असताना सोमवारी (७ सप्टेंबर) सायंकाळी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. शवविच्छेदनात प्रथमदर्शनी वाघिणीचा मृत्यू कार्डिओ रेस्पिरेटरी फेल्युअर' अर्थात हृदय व श्वासोच्छवास बंद पडल्याने झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, मृत्यूचे नेमके आणि अचूक कारण स्पष्ट करण्यासाठी तिच्या अवयवांचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे अंतिम अहवाल प्राप्त होईपर्यंत वाघिणीच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.

अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील सोनोरी आणि शिरजगाव कसबा परिसरात या वाघिणीने अवघ्या २४ तासांत दोन नागरिकांवर प्राणघातक हल्ले करून त्यांचा जीव घेतला होता. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांमध्ये तीव्र संतापही व्यक्त होत होता.

दरम्यान, वन विभागाच्या विशेष पथकाने ७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारच्या सुमारास शिरजगाव कसबा परिसरात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (NTCA) मार्गदर्शक तत्त्वांनुसार गुंगीचे औषध देऊन वाघिणीला यशस्वीरीत्या जेरबंद केले.

वाघिणीला बेशुद्ध केल्यानंतर प्रमाणित प्रचलित कार्यपद्धतीनुसार पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या चमूकडून तिच्यावर तातडीने पुढील उपचार सुरू करण्यात आले. मात्र, वाघिणीने उपचारांना अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. अखेर सोमवारी सायंकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

मंगळवारी (८ सप्टेंबर) पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूने NTCAच्या नियमावलीनुसार मृत वाघिणीचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदन अहवालानुसार, प्रथमदर्शनी 'कार्डिओ रेस्पिरेटरी फेल्युअर' हे मृत्यूचे कारण असल्याचे समोर आले आहे.

डार्टच्या औषधाबाबत तर्कवितर्क

वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी वापरण्यात आलेला डार्ट आणि त्यातील औषधाची तीव्रता याबाबत विविध प्रसारमाध्यमांत तसेच वृत्तपत्रांमध्ये उलटसुलट चर्चा आणि तर्कवितर्क सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर वन विभागाने मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी वाघिणीच्या अवयवांचे नमुने हिस्टोपॅथॉलॉजी आणि टॉक्सिकॉलॉजी चाचणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतरच वाघिणीच्या मृत्यूचे मूळ आणि अचूक कारण स्पष्ट होईल, अशी माहिती अमरावती प्रादेशिक विभागाचे उपवनसंरक्षक अर्जुना के.आर. यांनी दिली.

त्यामुळे सध्या शवविच्छेदनातून समोर आलेले 'कार्डिओ रेस्पिरेटरी फेल्युअर' हे केवळ प्रथमदर्शनी कारणअसून, अंतिम निष्कर्षासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande