लातूर - जि. प.च्या बैठकीला अधिकारी गैरहजर; मागासवर्गीय कर्मचारी संघटनांची विभागीय आयुक्तांकडे तक्रार
लातूर, 08 सप्टेंबर, (हिं.स.)। लातूर जिल्हा परिषद लातूर अंतर्गत मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींना बैठकीसाठी बोलावूनही संबंधित खातेप्रमुख व अधिकारी उपस्थित राहत नसल्याने कर्मचारी-अधिकाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित राहत असल्याची तक्रार म
आंदोलन


लातूर, 08 सप्टेंबर, (हिं.स.)। लातूर जिल्हा परिषद लातूर अंतर्गत मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींना बैठकीसाठी बोलावूनही संबंधित खातेप्रमुख व अधिकारी उपस्थित राहत नसल्याने कर्मचारी-अधिकाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित राहत असल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या लातूर जिल्हा पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

याबाबत विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. जिल्हा परिषद लातूरच्या सामान्य प्रशासन विभागाच्या ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या पत्राचा संदर्भ देत हे निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषद अंतर्गत खातेप्रमुखांच्या बैठकीसाठी शासनाच्या निर्देशानुसार मागासवर्गीय कर्मचारी-अधिकारी संघटनांचे अध्यक्ष, सचिव व पदाधिकाऱ्यांना बैठकीस बोलावले जाते. संघटनांचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित राहतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून बैठकीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित खातेप्रमुख स्वतः उपस्थित राहत नसून त्यांच्या प्रतिनिधींना पाठविले जाते.

बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहून इतिवृत्त पूर्ण करण्याची औपचारिकता पार पाडली जाते; मात्र कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या प्रश्नांवर अपेक्षित चर्चा होऊन त्यांचे निराकरण होत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मागासवर्गीय कर्मचारी व अधिकाऱ्यांचे अनेक प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

“बैठकीसाठी संघटनांच्या प्रतिनिधींना बोलावून संबंधित अधिकारी उपस्थित राहत नसल्याने आमची हेळसांड होत आहे. याची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीस उपस्थित राहण्याचे तसेच प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आदेश द्यावेत,” अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

निवेदनावर महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य अतिरिक्त महासचिव जी. टी. होसूरकर, विभागीय अध्यक्ष प्रविण सूर्यवंशी, जिल्हा अध्यक्ष नागसेन कांबळे, जिल्हा सचिव किशोर गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष आर. पी. हिंगे, बहुजन शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिनेश कांबळे, जिल्हासचिव शिवाजी पात्रे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष मस्के, ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार पिनाटे, बहुजन संसदेचे जिल्हाध्यक्ष मंगेश सुवर्णकार यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande