रविकांत तुपकर यांचे अमरावतीत अर्धनग्न आंदोलन; राज्यभर आंदोलनाचा इशारा
अमरावती, 08 सप्टेंबर (हिं.स.)। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसमवेत अर्धनग्न होत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. विदर्भात कोरडा दुष्काळ जाहीर करा
रविकांत तुपकर यांचे अमरावतीत अर्धनग्न आंदोलन; राज्यभर आंदोलनाचा इशारा


अमरावती, 08 सप्टेंबर (हिं.स.)। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसमवेत अर्धनग्न होत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. विदर्भात कोरडा दुष्काळ जाहीर करा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. हाती सोयाबीनची सुकलेली रोपे घेत आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. आज आम्ही आमच्या अंगावरील कपडे काढून आंदोलन करीत आहोत, उद्या मंत्र्यांच्या अंगावरील कपडे काढू, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

आंदोलकांच्या काय आहेत मागण्या?

विदर्भात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची मदत करावी, शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावा, शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली पाहिजे, निकृष्ट बियाणे पुरवणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशा आंदोलकांच्या मागण्या आहेत. कृषी विभागाचे अधिकारी बियाणे कंपनी कडून हप्ते घेतात, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, २०२९ पर्यंत सरकारला ही कर्ज माफी लांबवत ठेवायची आहे, असेही तुपकर म्हणाले.

पुढील काळात मोठे आंदोलन

आम्ही रस्त्यावर आलो की आमच्यावर गुन्हे दाखल केले जातात. हे सरकार इंग्रजांप्रमाणे वागत आहे, शेतकऱ्यांसाठी आवाज उठवल्याबद्दल आम्हाला तुरूंगात डांबले जाते. पण, येणाऱ्या काळात आम्ही शेतकऱ्यांसाठी मोठे आंदोलन उभारू. जातीच्या आंदोलनाच्या ठिकाणी तुम्हाला भेट द्यायला वेळ आहे पण शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला सरकारजवळ वेळ नाही, अशी टीका रविकांत तुपकर यांनी केली.

आम्ही शेतकऱ्यांसाठी संपूर्ण विदर्भात आता आंदोलन करू, त्याची सुरुवात आज अमरावती पासून होत आहे, हे आंदोलन राज्यभर होणार आहे. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे, असे तुपकर यांनी सांगितले. महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळात होरपळत आहे, आणि महाराष्ट्राचे सरकार मात्र शक्तिपीठ महामार्ग तयार करण्यात व्यस्त आहे, असे ते म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande