रायगड जिल्हा परिषदेत सहा, पनवेल पंचायत समितीत तीन स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार
तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात सहभागी होण्याची संधी रायगड, 8 सप्टेंबर (हिं.स.) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींना सहभागी करून घेण्यासाठी जिल्हा परिषद
The number of co-opted members will increase by 6 in the Raigad Zilla Parishad and by 3 in the Panvel Panchayat Samiti.


तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात सहभागी होण्याची संधी

रायगड, 8 सप्टेंबर (हिं.स.) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींना सहभागी करून घेण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याबाबत शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रायगड जिल्हा परिषदेत सहा, तर पनवेल पंचायत समितीत तीन स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील अनुभवी व्यक्तींना प्रशासनाच्या कामकाजात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

नवीन शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य निवडीसाठी निश्चित सूत्र आणि नियम स्पष्ट करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या बाबतीत प्रत्येक 20 सदस्यांमागे एक स्वीकृत सदस्य, तर पंचायत समितीच्या स्तरावर किमान तीन आणि त्यानंतर प्रत्येक दहा सदस्यांमागे एक स्वीकृत सदस्य या सूत्रानुसार संख्या निश्चित केली जाणार आहे.

रायगड जिल्हा परिषदेची एकूण सदस्यसंख्या 59 असल्याने शासनाच्या निर्णयानुसार येथे सहा स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्याचप्रमाणे पनवेल पंचायत समितीची एकूण सदस्यसंख्या 16 असून, येथे तीन स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. या नियुक्त्यांसाठी पात्र व्यक्तींची निवड शासनाने निश्चित केलेल्या नियम व निकषांच्या आधारे केली जाणार आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे स्वीकृत सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया आता वेग घेण्याची शक्यता आहे. आगामी एक ते दीड महिन्यात राज्यातील सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता असल्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक इच्छुकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजात जनसेवा, प्रशासकीय अनुभव तसेच विविध क्षेत्रांतील जाणकार व्यक्तींचा सहभाग वाढण्याची अपेक्षा आहे. स्थानिक प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी आणि विकासकामांना योग्य दिशा देण्यासाठी या माध्यमातून अतिरिक्त व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समितीतील स्वीकृत सदस्यांच्या निवडीकडे आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे. पात्र व्यक्तींची अधिकृत घोषणा झाल्यानंतर स्थानिक राजकारणातील समीकरणांनाही नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या अपेक्षा आणि स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यास या नियुक्त्या उपयुक्त ठरतील, अशी अपेक्षा आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande