‘डिजीम्हाडा’ ॲपवर म्हाडाच्या डिजिटल गणेशोत्सव स्पर्धेचा शुभारंभ
मुंबई, 08 सप्टेंबर (हिं.स.)। म्हाडाच्या विविध अभिन्यासांतील वसाहतींमध्ये गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेशभक्तांच्या उत्साहाला प्रोत्साहन देतानाच त्यांच्या सर्जनशीलतेला, सामाजिक बांधिलकीला आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्या
मुंबई


मुंबई, 08 सप्टेंबर (हिं.स.)। म्हाडाच्या विविध अभिन्यासांतील वसाहतींमध्ये गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेशभक्तांच्या उत्साहाला प्रोत्साहन देतानाच त्यांच्या सर्जनशीलतेला, सामाजिक बांधिलकीला आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘म्हाडा डिजिटल गणेशोत्सव २०२६ – गणेशोत्सव आपल्या घराचा, उत्सव म्हाडा परिवाराचा!’ या अभिनव स्पर्धेचा आज 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते ‘डिजीम्हाडा’ ॲपवर गो-लाईव्ह करून शुभारंभ करण्यात आला.

म्हाडाच्या राज्यभरातील विविध मंडळांच्या अभिन्यासांमध्ये तसेच म्हाडा वसाहतींमध्ये सार्वजनिक आणि वैयक्तिक स्तरावर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवातील वैविध्यपूर्ण संकल्पना, आकर्षक सजावट, सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक परंपरा आणि पर्यावरणपूरक प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘डिजीम्हाडा’च्या माध्यमातून म्हाडा परिवारातील गणेशोत्सवाच्या या उत्सवी परंपरेला डिजिटल व्यासपीठ मिळणार आहे.

म्हाडाच्या विविध विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रातील गणेशोत्सव मंडळे तसेच वैयक्तिक पातळीवर गणेशोत्सव साजरा करणारे म्हाडा रहिवासी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. स्पर्धकांना ‘डिजीम्हाडा’ ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणी करून आपल्या गणेशोत्सवाची वैशिष्ट्ये सादर करता येणार आहेत.

नोंदणीच्या वेळी स्पर्धकाचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, संबंधित म्हाडा वसाहत अथवा अभिन्यासाचे नाव आणि गणेशोत्सवाचा प्रकार यासंबंधीची माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर गणेशमूर्ती, सजावट आणि गणेशोत्सवाची वैशिष्ट्ये दर्शविणारी छायाचित्रे तसेच कमाल दोन मिनिटांचा व्हिडिओ ॲपवर अपलोड करता येणार आहे.

स्पर्धेचे आयोजन म्हाडाच्या राज्यातील विविध विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रानुसार जिल्हानिहाय करण्यात येणार आहे. मुंबई विभागाचे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे दोन स्वतंत्र विभाग करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील म्हाडा परिवाराला आपल्या गणेशोत्सवातील वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना, सजावट आणि सामाजिक उपक्रम महाराष्ट्रासमोर डिजिटल माध्यमातून मांडण्याची संधी मिळणार आहे.

या स्पर्धेत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. गणेशोत्सवाचे परीक्षण करताना नैसर्गिक व पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर, प्लास्टिकचा कमीत कमी वापर, पर्यावरणपूरक सजावट, जलसंवर्धन, निर्माल्य व्यवस्थापन, ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्याचे प्रयत्न तसेच सामाजिक व जनजागृतीपर संदेश देणाऱ्या सजावटीचा विचार केला जाणार आहे.

‘हरित गणेशोत्सव – स्वच्छ गणेशोत्सव’ या संकल्पनेला प्रोत्साहन देत पर्यावरणाचे संवर्धन आणि सामाजिक जाणीव जपत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन म्हाडाच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांची निवड सर्वाधिक मिळालेल्या मतांच्या आधारे केली जाईल. तसेच स्पर्धेतील विविध विभागांमधून उत्कृष्ट गणेशोत्सवांची निवड करून विजेत्यांना आकर्षक पारितोषिके आणि सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात येणार आहे. सर्जनशीलता, सामाजिक बांधिलकी, पर्यावरणपूरकता, सजावट आणि उत्सवाचे वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरण या विविध निकषांच्या आधारे स्पर्धेतील प्रवेशिकांचे परीक्षण करण्यात येणार आहे.

म्हाडाच्या या उपक्रमामुळे गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, सांस्कृतिक वारसा, सर्जनशीलता आणि पर्यावरण संवर्धन यांचा संदेश अधिक व्यापक पातळीवर पोहोचण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर म्हाडाच्या विविध वसाहतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना डिजिटल माध्यमातून एकत्र आणण्याचा हा उपक्रम ठरणार आहे.

‘डिजीम्हाडा’ च्या माध्यमातून म्हाडा परिवाराला जोडणाऱ्या या अभिनव उपक्रमात राज्यभरातील म्हाडा रहिवासी, गणेशोत्सव मंडळे आणि गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि आपल्या गणेशोत्सवाची वैशिष्ट्ये संपूर्ण महाराष्ट्रासमोर डिजिटल माध्यमातून सादर करावीत, असे आवाहन म्हाडाच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande