
सोलापूर, 08 सप्टेंबर (हिं.स.)। दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याकडील थकीत ऊसबिले मिळावीत, या मागणीसाठी सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी आक्रमक आंदोलन केले. शेतकऱ्यांनी चार हुतात्मा पुतळा ते पूनम गेट असा अर्धनग्न मोर्चा काढल्यानंतर पूनम गेट येथील झाडावर चढून आंदोलन केले. दरम्यान, तहसीलदारांनी मंगळवारी बैठक घेऊन बिलांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी झाडावरून खाली उतरत ठिय्या आंदोलन सुरू केले.
सन २०२३-२४ आणि २०२४-२५ या हंगामात सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी गोकुळ साखर कारखान्याला ऊस पाठविला होता. मात्र, कारखान्याकडून शेकडो शेतकऱ्यांची सुमारे अडीच कोटी रुपयांची ऊसबिले थकीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
थकीत बिले तातडीने मिळावीत, कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, तसेच तहसीलदारांवर कारवाई करावी, अशा विविध मागण्या आंदोलकांनी केल्या. मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्धनग्न मोर्चा काढत पूनम गेट येथे आंदोलन केले.
आंदोलनाची माहिती मिळताच सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. थकीत बिले मिळवून देण्यासाठी मंगळवारी बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर शेतकरी झाडावरून खाली उतरले; मात्र मागण्या मान्य होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
दरम्यान, कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने आंदोलनस्थळी अग्निशमन दलाची गाडी तैनात केली होती.
यावेळी अरविंद घोडके, अजित धुमाळ, संजय जेऊरे, शिवराज मुळजे, रुहुल्ला शेख, हणमंत बिराजदार, अभिजित सवळी, माणिकराव बनसोडे, काशीनाथ माने, शिवानंद सुरवसे आदी शेतकरी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड