पितळी गणरायासोबत मोदक दिव्याची क्रेझ; सजावटीसाठी वाढली मागणी
सोलापूर, 08 सप्टेंबर, (हिं.स.)। गणेशोत्सवाला काही दिवस शिल्लक राहिल्याने बाजारपेठेत उत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. गणेशमूर्तींसह पूजा आणि सजावटीसाठी आवश्यक साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झाली असून, यंदा पितळी वस्तूंना विशेष मागणी असल्
grdf


सोलापूर, 08 सप्टेंबर, (हिं.स.)। गणेशोत्सवाला काही दिवस शिल्लक राहिल्याने बाजारपेठेत उत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. गणेशमूर्तींसह पूजा आणि सजावटीसाठी आवश्यक साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झाली असून, यंदा पितळी वस्तूंना विशेष मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. नक्षीदार आणि सुबक पितळी गणेशमूर्ती विविध आकारांत बाजारात दाखल झाल्या आहेत.

पितळी गणेशमूर्ती एक इंचापासून दीड फुटापर्यंत उपलब्ध आहेत. या मूर्ती कायमस्वरूपी ठेवून त्यांची पूजा केली जाते. गणेशमूर्तींसोबत उरळी, पंचारती, धूपारती, कापूरपट्टी, पितळी लटकन समई, एकवाती डिझाईनचे दिवे, एकारती, घंटी, गदा, त्रिशूळ, चक्र, पितळी शृंगी, पाळणा, तबक, पंचपाळ, करंडे आणि नंदादीप यांचीही खरेदी वाढली आहे.

गणेशोत्सवातील सजावटीसाठी यंदा पितळी बैलगाडी, हत्ती, गाय, वासरू यांसह विविध प्राण्यांच्या आकर्षक प्रतिकृती बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या पितळी ताटांनाही ग्राहकांची पसंती मिळत आहे.

पितळी समईंमध्येही विविध प्रकार उपलब्ध असून, पाच इंचांपासून तब्बल पाच फुटांपर्यंतच्या समई बाजारात दाखल झाल्या आहेत. घरातील सजावटीसाठी तसेच पूजेसाठी त्यांना मागणी आहे. शिखरावर लावण्यासाठी पितळी कळसही उपलब्ध झाले आहेत.

दरम्यान, यंदा पितळेच्या दरात सुमारे २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, दरवाढीनंतरही पितळी वस्तूंच्या मागणीत फारशी घट झालेली नाही. पारंपरिक पितळी दिव्यांसोबतच नव्या आणि आकर्षक डिझाईनच्या वस्तूंनाही ग्राहकांकडून पसंती मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande