
सोलापूर, 08 सप्टेंबर (हिं.स.)। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहभागी असलेल्या शहर-जिल्ह्यातील सुमारे तीन हजार महिलांनी स्वेच्छेने योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेऐवजी नियमित मानधन मिळत असल्याने या महिलांनी संजय गांधी निराधार योजनेला प्राधान्य दिले आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना अन्य काही योजनांचा लाभ घेता येत नसल्याने महिलांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लाडकी बहीण योजनेतून आपली नावे वगळण्यात यावीत, यासाठी संबंधित महिलांनी अर्ज केले आहेत.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, ही रक्कम निश्चित वेळेत खात्यावर जमा होत नसल्याने गरजेच्या वेळी आर्थिक अडचणी निर्माण होत असल्याचे महिलांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मिळणारे मानधन लाभार्थी महिलांच्या खात्यावर नियमितपणे जमा होत असल्याने या योजनेला अधिक पसंती मिळत आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतून स्वेच्छेने नाव वगळणाऱ्या महिलांची संख्या शहर-जिल्ह्यात सुमारे तीन हजारांवर पोहोचली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड