सी-20 बैठकीसाठी रोषणाईने न्हाऊन निघाले नागपूर
संत्रा नगरी रोषणाईने न्हाऊन निघालेली असून, येथील निर्जीव भिंतीसुद्धा बोलक्या झाल्यात…
सी-20 बैठकीसाठी रोषणाईने न्हाऊन निघाले नागपूर


संत्रा नगरी रोषणाईने न्हाऊन निघालेली असून, येथील निर्जीव भिंतीसुद्धा बोलक्या झाल्यात… कारणही तसेच आहे. सी-20 या बैठकीचे…. संस्कृती आणि परंपरेने नटलेली नागपूर नगरी पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे. जागोजागी लाईटिंग लावण्यात आलेली आहे. तसेच अनेक ठिकाणी भिंतींना कलात्मक रंगरंगोटी केली असून सुंदर चित्रे सुद्धा काढली आहे. चौका-चौकातील रोडवर आकर्षक रंगातून अनूरुप चित्र काढण्यात आली आहेत. तसेच देश-विदेशातील पाहुण्यांना महाराष्ट्र व विदर्भांच्या समृद्ध वारशांचे देखाव्यांच्या माध्यमातून दर्शन घडविण्यासाठी वर्धा मार्गावर उज्जवलनगर दरम्यान आदिवासींचे लोकजीवन दर्शवणारे आकर्षक देखावे तयार करण्यात आले आहेत. डिजिटल बोर्ड लावलेली आहे. सिव्हील लाईनमध्ये जी-20 च्या सदस्य देशांचे ध्वज उभारण्यात आले आहेत. रोषणाईची ही नवलाई पाहण्यासाठी अबाल वृद्धांची गर्दी उसळत आहे. रोषणाईने न्हाऊन निघालेल्या नागपूर नगरीचे सौंदर्य मोबाईलमध्ये टिपण्यासाठी तरुणांचा उत्साह दिसत आहे.

संपूर्ण शहरात सजावट सुरु असताना मेट्रो प्रशासनाने एअरपोर्ट साऊथ स्टेशन परिसरात जी-20 चा सर्वात मोठा थ्री-डी लोगो साकारला आहे. ही संपूर्ण रचना 130 फूट रुंद आणि 20 फूट उंच असल्याने लक्षवेधक ठरत आहे.जागतीकस्तरावर नागपूरला मिळालेला सन्मान कौतुकास्पद असून जी-20 अंतर्गत नागरी समाज संस्थांचा अर्थात ‘सिव्हील सोसायटी’ (सी-20) या गटाची प्रारंभिक परिषद नागपूर येथे येत्या 20 ते 22 मार्च रोजी आयोजित केली आहे. जगात 1999 मध्ये आलेल्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर जागतिक आर्थिक स्थिरता आणि अर्थव्यवस्थेतील वाढीस चालना देण्याच्या उद्देशाने जी-20 ची स्थापना करण्यात आली.

सुरवातीला जी-20 हा सदस्य राष्ट्रांच्या अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांचे गर्व्हनर यांचा एक अनौपचारिक मंच होता. 2008 साली जगाला भयानक मंदीचा सामना करावा लागल्यानंतर या संघटनेतही बदल झाले आणि तिचे रूपांतर सदस्य राष्ट्रांच्या आघाडीच्या नेत्यांच्या संघटनेत झाले. यानंतर जी-20 राष्ट्रांच्या नेत्यांची वर्षातून एकदा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे या जी-20 गटाचे कोठेही मुख्यालय अथवा सचिवालय नाही. जी-20 ची शिखर परिषद ही चक्राकार पद्धतीने निवड झालेल्या सदस्य राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी त्या-त्या देशात आयोजित केली जाते.गेल्या 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत भारत जी-20 संघटनेचे अध्यक्षपद भूषवत आहे. भारताच्या यजमानपदात आयोजित या परिषदेचे घोषवाक्य “वसुधैव कुटुम्बकम्” अर्थात ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ हे आहे. पृथ्वीतलावरील मानव, प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव यांच्यासह संपूर्ण जीवसृष्टीचे महत्व आणि त्यांच्यातील परस्परसंबंधाचे महत्त्व या संकल्पनेतून अधोरेखित करण्यात आले आहे.

जी-20 सदस्य समुहात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राजील, कॅनडा, चीन, फ्रांस, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया गणराज्य, मेक्सिको, रशिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका, तुर्की, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आणि युरोपीयन संघ या देशांचा समावेश आहे. जी-20 हा गट व्यापार, गुंतवणूक, कर आणि आर्थिक धोरणांसह जागतिक अर्थव्यवस्थेशी संबंधित असलेल्या विविध मुद्यांवर लक्ष केंद्रित करतो. यातून सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना देण्यात येते. जी-20 ने सुरुवातीला व्यापक आर्थिक मुद्यांवर लक्ष केंद्रित केले. परंतु कालांतराने या गटाने व्यापार, हवामान बदल, शाश्वत विकास, आरोग्य, कृषी, ऊर्जा, पर्यावरण आणि भ्रष्टाचारविरोध या मुद्यांचा समावेश करुन कार्यविस्तार केला आहे. सिव्हिल-20 (सी-20) हा नागरी समाज संस्थांचा एक गट आहे. हा गट सामाजिक विकास, मानवी हक्क आणि लैंगिक समानता यासह विविध विषयांवर जी-20 ला शिफारशी करतो. सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्याचे काम या गटाद्वारे केले जाते. जगभरातील अशासकीय, सेवाभावी, नागरी समाज संस्थांना या गटामुळे जागतिक मंच उपलब्ध झाला आहे. जी-20 मध्ये नागरी समाज संस्थांच्या सहभागाची सुरुवात 2010 मध्येच झाली होती, मात्र अधिकृत गट म्हणून सी-20 ची स्थापना 2013 मध्ये करण्यात आली. यावर्षी सी-20 गटाची प्रारंभिक परिषद नागपूर येथे येत्या 20 ते 22 मार्च रोजी आयोजित करण्यात येत आहे.

जागतिक आर्थिक धोरण आखतांना नागरिकांच्या अपेक्षा प्रतिबिंबीत करण्याची महत्वपूर्ण भूमिका सिव्हिल सोसायटी ऑर्गनाजेशन्स अर्थात नागरी समाज संस्था (सी-20) ‘जी-20’ समुहामध्ये पार पाडते. हा गट आर्थिक हितसंबंध आणि नागरिकांचे हित यांच्यात संतुलन राखण्यात मदत करतो. त्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि देवाण-घेवाणीचे केंद्र म्हणून नागपूर शहराला सादर करण्यासाठी हे महत्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.

शाश्वत विकासात नागरी संस्थांचे योगदान ही सी-20 परिषदेची मध्यवर्ती कल्पना आहे. या संकल्पनेवर आधारित 14 विषयावंर परिषदेत चर्चा होणार आहे. यामध्ये नद्यांचे पूनरुज्जीवन व पाणी व्यवस्थापन, लोकशाहीच्या अंमलबजावणीसाठी पूर्वलक्ष, हस्तकला आणि संस्कृती, पारंपारिक आणि सृजनात्मक मार्गाने रोजगार, लैगिंक समानता आणि अपंगत्व, शाश्वत आणि परिवर्तनशील समुदाय, वातावरण, पर्यावरण आणि नेट झिरो टार्गेट, तंत्रज्ञान, संरक्षण आणि पारदर्शिता, वसुधैव कुटुंबकतलग एक परिवार, पर्यावरणासाठी जीवनशैली, विविधता, परस्पर आदर, सेवा आणि स्वयंसेवकपणाची भावना या विषयांचा समावेश आहे. जगातील कोणतीही व्यक्ती विकास प्रक्रीयेत मागे राहू नये’ या दृष्टीकोनातून सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि आदान-प्रदानाचे केंद्र म्हणून जगापुढे सादर करण्याची संधी नागपूर शहराला या परिषदेमुळे मिळाली असून ही कौतुकास्पदबाब आहे.

-कविता फाले-बोरीकर

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande