स्वच्छ प्रतिमा आणि बाळासाहेबांची पुण्याई एवढेच राऊतांचे संचित
रत्नागिरी, २४ एप्रिल (हिं.स.): सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विद्यमान
विनायक राऊत 


रत्नागिरी, २४ एप्रिल (हिं.स.): सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विद्यमान खासदार विनायक राऊत निवडणूक लढवत आहेत. ते गेली सलग दहा वर्षे या भागाचे खासदार आहेत. यापूर्वीच्या दोन्ही निवडणुका त्यांना तशा सोप्या गेल्या असल्या तरी यावेळी मात्र राजकारणामधील घडामोडींमुळे बाळासाहेब ठाकरे यांची पुण्याई आणि श्री. राऊत यांची स्वतःची स्वच्छ प्रतिमा एवढेच संचित त्यांच्याकडे आहे.

श्री राऊत २०१४ साली सर्वप्रथम खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी तेव्हाचे काँग्रेसचे उमेदवार नीलेश राणे यांचा पराभव केला. तेव्हा शिवसेना या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सगळ्याच बाबतीत पुढे होती. नीलेश राणे यांचा मतदारसंघाशी नसलेल्या संपर्क आणि कार्यकर्त्यांशी असलेली तुटकपणाची वागणूक यामुळे त्यांना तेव्हा पराभव पत्करावा लागला. पुढच्या वेळच्या म्हणजे गेल्या वेळच्या निवडणुकीत श्री. राऊत यांच्यासमोर नीलेश राणे हेच उमेदवार होते. फक्त त्यांनी काँग्रेसऐवजी स्वतःच्या स्वाभिमान पक्षाकडून ती निवडणूक लढविली होती. लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये एका कणकवली मतदारसंघात श्री. राणे यांनी श्री. राऊत यांच्यापेक्षा दहा हजार मतांची आघाडी घेतली होती. मात्र निवडणुकीत ते पराभूत झाले. कारण तेव्हा शिवसेना एकसंघ होती. आता यावेळची परिस्थिती खूपच बदललेली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये फाटाफूट झाली आहे. अनेक मान्यवर नेते उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गटात सामील झाले आहेत आणि महायुती म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा प्रचार करायचे ठरविले आहे.

श्री. राऊत यांचा लोकसंपर्क चांगला आहे. गावागावांमध्ये ते पोहोचलेले आहेत, असा त्यांचाच दावा आहे. एखाद्याच्या घरी भजन सुरू असेल तर तेथे ते स्वतः जाऊन पेटीही वाजवतात. आरतीमध्ये सहभागी होतात. दोडामार्ग ते चिपळूण या संपूर्ण मतदारसंघात त्यांचा संपर्क आहे, पण केवळ संपर्कावर निवडणूक जिंकता येणे कठीण आहे. श्री. राऊत यांची पाटी सगळ्याच अर्थाने कोरी आहे. दहा वर्षे लोकसभेत काम करत असताना त्यांनी मतदारसंघाच्या दृष्टीने केलेले कोणतेही ठळक काम त्यांना स्वतःलाही सांगता येणार नाही. राजापूर विधानसभा मतदारसंघातील नियोजित रिफायनरी प्रकल्पाला कडाडून केलेला विरोध आणि सातत्याने या विरोधकांशी त्यांचा असलेला समन्वय, आंदोलनासाठी पुढाकार घेणाऱ्यांना सातत्याने दिलेल्या पाठिंबा आणि शक्य असेल तेथे त्या प्रकल्पाच्या विरोधाची भूमिका ठोसपणे मांडणे एवढेच त्यांचे महत्त्वाचे काम सांगता येऊ शकेल, पण रिफायनरी प्रकल्प संपूर्ण लोकसभा मतदारसंघावर प्रभाव पाडू शकत नाही. तो केवळ राजापूर तालुक्यापुरता आणि त्यातही त्यात ठराविक भागापुरता मर्यादित आहे. प्रकल्पाला विरोध करणारे लोक जसे आहेत, तसेच प्रकल्पाला पाठिंबा देऊन आपल्या जमिनी स्वतःहून देणारे शेतकरीही त्या भागामध्ये आहेत. त्यामुळे संपूर्ण भागच प्रकल्पाच्या विरोधात आणि विनायक राऊत यांच्या बाजूने आहे, असे चित्र नाही. मात्र त्या विधानसभा मतदारसंघात स्थानिक आमदार राजन साळवी यांचा प्रभाव आहे. ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत. तो प्रभाव एवढेच विनायक राऊत यांचे मतांच्या दृष्टीने भांडवल आहे.

चिपळूण विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे भास्कर जाधव यांचा प्रभाव आहे. त्यांची मदत श्री. राऊत यांना होऊ शकेल, असे मानले जाते. पण तेथेही अलीकडे श्री. जाधव आणि श्री. राऊत यांच्यातील वाद पुढे आला होता. त्याचा परिणाम आणि उद्धव ठाकरे शिवसेनेत भास्कर जाधव यांचा ओसरलेला प्रभाव यामुळे त्यांचा प्रचारासाठी श्री. राऊत यांना कितपत उपयोग होईल, हे सांगता येणार नाही. त्याच मतदारसंघात खऱ्या अर्थाने लोकप्रिय असलेले शेखर निकम राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांनी मतदारसंघ बांधून घेतलेला आहे. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर मतविभागणी होऊन शेखर सर यांच्यासाठी नारायण राणे यांना अधिक मतदान होण्याची शक्यता आहे. ती विनायक राऊत यांना त्रासदायक ठरणार आहे.

श्री. राऊत यांच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभव नाईक या कुडाळच्या आमदाराचा प्रभाव उपयोगी ठरू शकेल, पण एकूण मतदारसंघाचा विचार करता कुडाळ मतदारसंघातील मतदारांची संख्या तुलनेने कमी आहे. शिवाय त्या भागात नारायण राणे आणि त्यांचा पुत्र आमदार नीतेश राणे यांचा चांगलाच दबदबा आहे. आमदारकी उद्धव ठाकरे शिवसेना गटाकडे असली तरी संपूर्ण जिल्ह्यात जिल्हा बँक, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका या बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थांवर राणे यांचे अनुयायी आहेत. त्याचा उपयोग राणेंनाच अधिक होईल. विनायक राऊत यांना तेथे होणारे मतदान खूपच कमी असण्याची शक्यता आहे.

सावंतवाडी मतदारसंघात विद्यमान शिक्षण मंत्री दीपक केसरकर शिंदे गट शिवसेनेचे प्रवक्ते आहेत. श्री. केसरकर आणि श्री. राणे सातत्याने एकमेकांच्या विरोधात होते, मात्र आता महायुती म्हणून दोघेही नेते एकत्र झाले आहेत. निवडणुकीसाठी श्री. राणे यांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी श्री. केसरकर यांनी श्री. राणे यांनी केंद्रीय मंत्री म्हणून केलेल्या कामगिरीची भलामण केली होती. त्यांच्यासारखा खासदार या भागाला लाभला, तर केंद्रात कोकणाचे अनेक प्रश्न सोडविले जाऊ शकतील, असे वक्तव्य त्यांनी केले होते. आता तर महायुती झाली आहे. त्यामुळे ते कसून कामाला लागून राणे यांना अधिक मतदान होण्यासाठी निश्चितच प्रयत्न करतील. विनायक राऊत यांना तो अडसर ठरू शकतो.

कणकवली मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचाच आहे. नीतेश राणे प्रतिनिधित्व करत असलेल्या मतदारसंघावर अर्थातच भाजपचा प्रभाव आहे. त्याचा उपयोग नारायण राणे यांना होऊ शकतो. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे अनेक नेते-कार्यकर्ते उदय सामंत यांच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे तेथे शिवसेनेच्या मूळ कार्यकर्त्यांची संख्या कमीच आहे. त्याचा फटका विनायक राऊत यांना बसू शकतो.

या सर्वात गेल्या वेळच्या निवडणुकीपेक्षा आणखी एक झालेला मोठा बदल म्हणजे यावेळी उमेदवारी भारतीय जनता पक्षाला मिळालेली आहे. खासदार म्हणून भारतीय जनता पक्षाची ही पहिलीच उमेदवारी आहे. यापूर्वीच्या सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या उमेदवारासाठीच युती म्हणून काम केले होते. गेल्या दोन्ही वेळी विनायक राऊत यांच्या झालेल्या विजयात भारतीय जनता पक्षाचा वाटा मोठा होता. यावेळी भाजपची ती सर्व मते नारायण राणे यांच्याकडेच जातील. निवडणूक जाहीर होण्याच्या फार पूर्वीपासून भारतीय जनता पक्षाचे तेथील कार्यकर्ते, लोकसभा मतदारसंघाचे पक्षाचे सहप्रभारी बाळ माने जिल्हा परिषद गटनिहाय बैठका घेऊन वातावरणनिर्मिती करत होते. आता त्याची जागा प्रचाराने घेतली आहे. त्याचा फायदा नारायण राणे यांनाच होण्याची शक्यता आहे. विनायक राऊत यांना ते त्रासदायक ठरू शकते.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर विनायक राऊत ठिकठिकाणी अंगणातल्या बैठकांपासून मोठ्या सभांपर्यंत प्रचार करत आहेत, पण भाजपने ज्या पद्धतीने प्रचारात आघाडी घेतली होती, त्या तुलनेत शिवसेना आणि विनायक राऊत कोठेच नव्हते. शिवाय खासदारकीच्या दहा वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने निवडून येऊनही श्री. राऊत यांनी भाजपच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना पुरेसा मान दिलेला नाही. त्यामुळेही भाजपचे नेते-कार्यकर्ते नाराज होते. त्यांची ही नाराजी मोठ्यात फरकाने नारायण राणे यांना निवडून देण्यात परिवर्तित होण्याची शक्यता अधिक आहे. एकंदरीत राऊत यांची स्वतःची स्वच्छ प्रतिमा आणि ते ज्या शिवसेनेचे नेतृत्व करत आहेत, त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आराध्य दैवत असलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्याई एवढ्याच भांडवलावर विनायक राऊत यांना ही निवडणूक लढवावी लागणार आहे. मतांच्या बेरीज-वजाबाकीमध्ये कोण सरस ठरतो, हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande