शेतकऱ्यांसाठी पीएम प्रणाम योजना : रासायनिक खताच्या वापरात बचत
आधुनिक शेतीच्या वाटेवर वाटचाल करीत असताना उत्पादन वाढीसाठी शेतीत विविध प्रयोग करण्यात येतात. त्याचबर
शेतकऱ्यांसाठी पीएम प्रणाम योजना : रासायनिक खताच्या वापरात बचत


आधुनिक शेतीच्या वाटेवर वाटचाल करीत असताना उत्पादन वाढीसाठी शेतीत विविध प्रयोग करण्यात येतात. त्याचबरोबर रासायनिक खताचा वापर असंतुलित होत असतो, त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढतो. रासायनिक खताचा योग्य वापर करण्यासाठी माती परिक्षण करुन त्यानंतर दिल्या जाणाऱ्या पिकनिहाय शिफारशींचा विचार करुन खताच्या योग्य मात्रा दिल्यास, उत्पादन खर्च कमी होऊन रासायनिक खताच्या असंतुलित वापरामुळे जमिनीचे नुकसान टाळता येऊ शकते. त्यासाठी नॅनो खताची पीएम प्रणाम योजना राबविण्यात येत आहे.

खर्चाचा भाग म्हणून जर रासायनिक खताचा वापर कमी करण्यासाठी पिक आणि जमिनीच्या प्रतवारीनुसार गरजा या गोष्टींची संपुर्ण माहिती असावी. युरियाच्या अतिरिक्त वापराचे दुष्परिणामामुळे पिकाची अधिक वाढ होते. विशेष करुन पिकाची पाने लुसलुशीत आणि मऊ होतात. टणकपणा व कणखरपणा कमी झाल्याने कीड रोगाचा विशेष करुन रसशोषक किडीचा प्रादुर्भाव वाढतो. सहाजिकच किटकनाशकाचा वापर करणे भाग पडते आणि उत्पादन खर्चात वाढ होते.

युरिया खताची अवाजवी वापरामुळे जमिनीच्या आरोग्यावर परिणाम होतो, जमिनीतील कार्ब : नत्र यांचे गुणोत्तर कमी होऊन सूक्ष्मजीवांची संख्या कमी होते. त्याचा परिणाम उत्पन्नावर होऊन उत्पादनात घट होते.

युरियाचा वापर कमी करण्यासाठी तृणधान्य पिकांना अॅझीटोबॅक्टर जिवाणू संवर्धक आणि द्विदल पिकांना रायझोबियम या जिवाणू संवर्धकांची २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे याप्रमाणे प्रक्रिया करावी. यामुळे पिकांमध्ये १५ ते २० टक्के नत्राची बचत होते. विशेष बाब म्हणजे ऊसामध्ये ५० टक्केपर्यत बचत होते. नत्र खते उघड्यावर फेकून देऊ नये. खते दिल्यानंतर जास्त पाणी देऊ नये. निचऱ्याद्वारे ऱ्हास होत नाही. हिरवळीचे खते, सेंद्रीय खते आणि द्विदल धान्य वापरल्याने जमिनीतील कर्बाचे प्रमाण वाढते. जमिनीची सुपिकता वाढते. तसेच रासायनिक खतामध्ये बचत होते.

शेणखत चांगले कुजलेले असावे अन्यथा पिक वाढीच्या अवस्थेत नत्राची कमतरता जाणवते, तसेच अर्धवट कुजलेल्या शेणखतामुळे हुमणी आणि इतर किटकांचा प्रादुर्भाव जाणवतो. शेणखताचा वापर पेरणीच्या 15-20 दिवस आधी करावा. खुप आधी टाकल्यास त्याची कार्यक्षमता पर्यायाने कमी होते. गांडुळ खताचा वापर करताना ते शक्यतो स्वतः तयार केलेले असावे, विकत आणल्यास त्याची गुणवत्ता तपासून घ्यावी. हिरवळीचे खत गिरीपुष्प, शेवरी पेरतानाच द्यावे, त्यामुळे पुढील 20-25 दिवसात त्यांचे विघटन होऊन नत्राची उपलब्धता होते. धैंचा किंवा बोरु २५ ते ४० किलो प्रति हेक्टर या प्रकारच्या हिरवळीच्या खताचा वापर पेरणीच्या 30-35 दिवसानंतर अथवा फुलोऱ्यावर येण्याआधी करावा. पिकांचे अवशेष शेतात असल्यास ते जागीच गाडुन टाकावे. मुग, चवळी, सोयाबीन, मटकी, कुळीत, गवार ही पिके फुलोऱ्याआधी जमिनीत गाडुन टाकावे. बाजारामध्ये विविध प्रकारच्या सेंद्रिय निविष्ठा उपलब्ध आहेत. त्याच्या गरजेनुसार उपयोग करून अनावश्यक खर्च टाळावा.

मृदा आरोग्य अबाधित राखण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन चालना देण्याकरिता मृद तपासणीवर आधारित राज्यात ३१ जिल्ह्यास्तरावर शासकीय मृद तपासणी प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळांमध्ये प्रमुख आणि सूक्ष्म अन्नद्रव्य विश्लेषण करण्यात येते. त्यानुसार खताच्या वापराबाबत शिफारस करण्यात येते. त्याप्रमाणे खताचे नियोजन केल्यास बऱ्याच प्रमाणात रासायनिक खतांची बचत करता येईल. तसेच उत्पादन खर्च कमी होईल.

नॅनो युरिया, नॅनो डीएपीचा वापर महत्वाचा ठरत आहे. नॅनो युरिया हा नत्राचा स्त्रोत असून, नॅनो डीएपी हे नायट्रोजन व फॉस्फरसचे उत्कृष्ट स्त्रोत आहे. हे द्रव रुपातील खते असल्यामुळे यांचा वापर जमिनीद्वारे न करता पानांवर फवारण्यासाठी केला जातो. त्यामुळे जमिनीचे आरोग्य, पाणी व पर्यावरण प्रदूषण होत नाही. पारंपारिक खतांच्या किंमतीपेक्षा कमी किंमत असल्यामुळे उत्पादनाचा खर्च कमी झाल्यामुळे उत्पन्न वाढ होते. त्यामुळे बाजारामध्ये उपलब्ध नॅनो युरियाची ५०० मिली बॉटलची किंमत २२५ रूपये इतकी असून पारंपरिक युरियाच्या ४५ किलो बॅगची किंमत २६६ रुपये इतकी आहे. पिकासाठी उपलब्ध नत्राचे प्रमाण तुलनात्मक सारखेच आहे. नॅनो डीएपीची ५०० मिलि बॉटलची किंमत ६०० रूपये इतकी असून पारंपारिक डीएपीच्या ५० किलो बॅगची किंमत १३५० इतकी आहे. तुलनात्मकदृष्ट्या उत्पादन खर्चाचा विचार केल्यास पारंपारिक युरिया व डीएपीऐवजी नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीचा वापर कमी खर्चाचा आहे.

खरीप-२०२३ साठी केंद्र शासनाकडील मंजूर आवंटनापैकी १० टक्के पारंपारिक युरियाचे आवंटन कमी करुन १७ लाख नॅनो युरियाच्या बॉटलचे आवंटन करण्यात आले आहे. नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीच्या बॉटल बाजारात उपलब्ध आहे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या पीएम प्रणाम योजनेचे मुख्य उद्दिष्ट रासायनिक खताचा संतुलित, शाश्वत वापरास प्रोत्साहन देऊन धरणी मातेचे आरोग्य वाचवण्यासाठी रासायनिक खतांचा असंतुलित वापर टाळून सेंद्रिय, जैविक आणि नॅनो खताचा अवलंब करणे आहे.

राज्यामध्ये लोकसहभागातून मातृभुमीचे आरोग्य पुनर्संचयित करण्याबाबत जागरुकता निर्माण करणे. नैसर्गिक, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे, सेंद्रिय, जैविक आणि नॅनो खताच्या वापरास प्रोत्साहन देणे, नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करणे, ही या योजनेची उद्दिष्टे आहेत.

मातीची सुपीकता पुनर्संचयित होणे. खतांच्या लिचिंग निक्षालनामुळे दूषित होणारे भु जलाचे प्रमाण कमी होईल. हरितगृह वायुचे उत्सर्जन कमी होऊन सेंद्रिय कार्बचे प्रमाण सुधारेल, ही या योजनेची फायदे आहेत.

मागील तीन वर्षाच्या सरासरी वापराच्या तुलनेत युरिया, डीएपी, एनपीकेएस आणि एमओपी या रासायनिक खतांचा वापर कमी करुन चालू वर्षाच्या खत वापराशी तुलना करुन बचत होणाऱ्या अनुदानाच्या वाट्यापैकी ५० टक्के रक्कम राज्याना मिळणार आहे. सदर रक्कमेपैकी ६५ टक्के अनुदानाची रक्कम राज्यातील भांडवली प्रकल्पासाठी खर्च करण्यात येईल. उर्वरीत अनुदानाची रक्कम राज्याना कृषी विकास कार्यक्रमासाठी दिली जाणार आहे.

मनोजकुमार ढगे,

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, बुलडाणा.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande