धुळे,1 ऑक्टोबर (हिं.स.) लोकसभा निवडणूकीतील त्रृटींचा अभ्यास करुन आगामी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश प्रधान सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आयोजित धुळे जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ निवडणूक तयारीचा आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे उपस्थित होते.
मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम म्हणाले की, धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका शांततामय व निष्पक्ष वातावरणात होतील, याची दक्षता घेण्याबरोबरच निवडणूक कामकाजात कर्तव्यावर असलेल्या सर्व नोडल अधिकाऱ्यांनी निवडणूक कर्तव्यांचे काटेकोर पालन करावे. सर्व नोडल अधिकाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक पुस्तिकेचे वाचन करावे. नवमतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. मतदारयादीतील नावे वगळतांना संबंधितांना नोटीस देण्यात यावी. प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांसाठी पिण्याचे पाणी, दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी रॅम्पची व्यवस्था, मतदारांसाठी मेडीकल कीटची व्यवस्था करावी. एकाच इमारतीत अधिक मतदान केंद्र असेल तेथे गर्दी टाळण्यासाठी मतदारांना बसण्यासाठी वेटींग रुमची व्यवस्था करावी.
मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी मतदार चिठ्ठी, मतदार मार्गदर्शिका पुस्तिका तसेच अंध दिव्यांगासाठी ब्रेललिपी वोटर स्लिप मतदारांपर्यंत वेळेत पोहोचतील याची दक्षता घ्यावी. एकाच ठिकाणी 5 पेक्षा जास्त मतदान केंद्र असल्यास गर्दीचे नियंत्रण करण्यात यावे. राज्य सीमेवरील चेकपोस्टवर दक्षता घ्यावी, राज्य उत्पादन शुल्क, परिवहन विभाग, वन विभाग, पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने चेक पोस्टवर गस्त घालावी. सोशल मीडिया, फेक न्यूज, पेड न्यूजवर लक्ष देवून द्यावे असे आढळल्यास संबंधितांतवर कारवाई करावी. मतदानाच्या काळात सोशल मीडीयावर प्रसारीत होणारे, गैरसमज पसरविणारे संदेश व इतर घटनांवर लक्ष ठेवून अशा घटनांचे त्वरीत खंडन करावेत. एफएसटी, एसएसटी पथकांने वाहने, हेलीकॉफ्टरची तपासणी करावी. निवडणूकीसाठी नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांचे मानधन ऑनलाईन देण्यात यावेत. निवडणूक कर्मचाऱ्यांना फोटो आयडी कार्ड वितरीत करावे. होम वोटींगचे नियोजन करावे. स्टार प्रचारकांच्या सभांचे व्हिडीओ रेकाँर्डिग करावेत.
निवडणूक आयोगामार्फत प्राप्त झालेल्या ईपीक कार्डाचे 100 टक्के वितरण झाल्याची खात्री करावी. मतदानासाठी प्रत्येकाला टोकन नंबर द्यावे, सुक्ष्म निरीक्षकांना विविध अहवाल देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात यावेत. मतदानाची आकडेवारी दर दोन तासांनी अचूक देण्यात यावी. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास त्वरीत कार्यवाही करावी. उमेदवारांच्या खर्चावर काटेकोरपणे लक्ष ठेवावे. कुठेही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी विशेष दक्षता घ्यावी. चेकपोस्टच्या ठिकाणी वाहनांची तपासणी काटेकोरपणे करावी, ईव्हीएम मशीन संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करावी. नागरिकांना मतदार यादीतील नाव शोधण्याबाबत माहिती देऊन त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे. मनुष्यबळाचे योग्य नियोजन करुन आवश्यकतेप्रमाणे राखीव मनुष्यबळ वापरावे. मतदानाच्या दिवशीचे सर्व अहवाल विहित नमुन्यात आणि विहित वेळेत पाठवावे. मतदानासाठी मतदारांवर कुठलाही दबाव येणार नाही तसेच त्यांना कोणतेही अमिष दाखविले जाणार नाही याची दक्षता घेऊन निवडणूक निर्भय व निरपेक्ष वातावरणात पार पडण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याची सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हाधिकारी श्री.पापळकर म्हणाले की, सर्व विधानसभाक्षेत्रात निवडणुक प्रक्रियेची प्राथमिक तयारी पुर्ण झाली आहे. ज्याठिकाणी मतदानाची टक्केवारी कमी होती त्याठिकाणी स्वीप उपक्रमांतर्गत मतदान जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तसेच मतदान केंद्रावर देण्यात येणाऱ्या सुविधा, मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे, यावेळी त्यांनी जिल्हयातील निवडणुकीच्या तयारीचे सादरीकरण केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धिवरे यांनी पोलीस विभागाने केलेल्या तयारीची माहिती दिली. यामध्ये कायदा व सुव्यवस्था, चेक पोस्टवरील बंदोबस्त, मनुष्यबळाची उपलब्धता, प्रतिबंधात्मक कारवाई आदिंबाबत माहिती देऊन निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे यांनी प्रास्ताविक केले तर निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या बैठकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, रोहन कुवर, नितिनकुमार मुंडावरे, संजय बागडे यांच्यासह सर्व नोडल अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी आदि उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर