नागपूर शहरातील विकासकामे तातडीने सुरू करावीत;  मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई, 9 मे (हिं.स.)।नागपूर महानगराच्या चौफेर विकासासाठी जे आराखडे व नियोजन झाले आहे त्याप्रमाणे तत्काळ कामे सुरू झाली पाहिजे. ऑरेंज सिटी स्ट्रिट प्रकल्प येथे परफार्मन्स गॅलरी, झिरो मॉईल सुशोभिकरण, कॉटन मार्केट विकास, फुल मार्केट, कारागृह स्थलांतरण ह
नागपूर शहरातील विकासकामे तातडीने सुरू करावीत;  मुख्यमंत्र्यांचे आदेश


मुंबई, 9 मे (हिं.स.)।नागपूर महानगराच्या चौफेर विकासासाठी जे आराखडे व नियोजन झाले आहे त्याप्रमाणे तत्काळ कामे सुरू झाली पाहिजे. ऑरेंज सिटी स्ट्रिट प्रकल्प येथे परफार्मन्स गॅलरी, झिरो मॉईल सुशोभिकरण, कॉटन मार्केट विकास, फुल मार्केट, कारागृह स्थलांतरण ही कामे महानगराच्या चौफेर विकासाला हातभार लावणारी आहेत. यादृष्टीने संबंधित यंत्रणांनी प्रस्तावित कामे तत्काळ सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. अखंड भारताचा केंद्रबिंदू असलेले ‘झिरो माईल’ हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरावे अशा पद्धतीने त्या परिसराचा विकास करण्याची सूचना त्यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाशी संबंधित कामांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली. महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, तसेच संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

नागपूर शहराच्या आणि अखंड भारताच्या केंद्रस्थानी असलेले झिरो माईल स्टोन येथे सध्या पर्यटक येतात, तथापि तेथे त्यांनी थांबावे यासाठी या परिसराचा विकास होणे आवश्यक आहे. यादृष्टीने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने प्रस्ताव तयार करण्यात आला असून या प्रस्तावास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. या परिसरातील जागा राज्य शासनाच्या अखत्यारित असून येथे अखंड भारत कसा होता ? त्यावेळी केलेल्या सर्वेक्षणानुसार नागपूर केंद्रस्थानी कसे आले याबाबचा इतिहास दर्शविणारे एक्सपिरियन्स सेंटर तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. एकूण 45 कोटींच्या प्रस्तावित प्रकल्पात नैसर्गिक प्रकाशाचा वापर करून संग्रहालय, आवश्यक सोयी सुविधा आणि वाहनतळ तयार करण्यात येईल, तसेच भविष्यात महानगरपालिकेमार्फत याची देखभाल दुरुस्ती केली जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

सर्व कामे दर्जेदार व्हावीत- चंद्रशेखर बावनकुळे

कामठी येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत व्यावसायिक पद्धतीने बांधकाम करण्यात येणार आहे. येथे 7 हजार कंत्राटी कामगारांसाठी घरे बांधण्यात येणार असून महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने हे काम हाती घेऊन हा प्रकल्प तातडीने सुरू करावा, असे निर्देश पालकमंत्री श्री.बावनकुळे यांनी दिले. शासकीय मुद्रणालयाच्या जागेचाही पुनर्विकास करण्यात येणार असून तेथे मुद्रणालयासह अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या कार्यालयासाठी जागा देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. नागपूर शहराच्या विकासाची सर्वच कामे दर्जेदार व्हावीत, असे निर्देश पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande