सर्व जगाला शांतता व अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या महात्मा गांधी यांच्या २ ऑक्टोबर या जयंतीदिनी दरवर्षी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा करण्यात आला. समाजउभारणीसाठी अहिंसेची ताकद दर्शवणारा हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने २००७ साली घोषित केला होता.
गांधींचा अहिंसेचा वारसा
महात्मा गांधींचे सत्याग्रह व अहिंसक प्रतिकाराचे तत्वज्ञान आधुनिक इतिहासातील सर्वात जास्त परिणामकारक परिवर्तनकारी शक्तींमधील एक आहे. ब्रिटिशांच्या राज्यविरोधातील त्यांच्या शांततापूर्ण निदर्शनांमधून, विशेषतः १९३० मधील दांडीयात्रेसारख्या आंदोलनांमधून जुलमी शक्तींच्या विरोधात अहिंसा तत्वाच्या ताकदीवर असलेला त्यांचा विश्वास अधोरेखित होतो. महात्मा गांधीसाठी अहिंसेचे तत्व हे केवळ राजकीय आंदोलनांसाठीचे हत्यारच नव्हे तर एक जीवनपद्धती होती. शांतता मिळवण्यासाठी शांततापूर्ण मार्गच चोखाळावे लागतात यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता.
महात्मा गांधींचे प्रसिद्ध वाक्य आहे, “अहिंसा तत्व हे मानवजातीला उपलब्ध असलेली सर्वात मोठी शक्ती आहे. सर्व विनाशकारी आयुधांपेक्षाही याची ताकद जास्त आहे.” अमेरिकेतील मार्टिन ल्युथर किंग जुनियर यांच्या मानवी हक्कासाठीच्या चळवळीपासून दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांची वर्णभेदाविरोधातील आंदोलनापर्यंत जगभरातील अनेक चळवळी याच तत्वाने प्रेरित झाल्या आहेत. त्यांच्या तत्वज्ञानाचा अनेक नेत्यांवर, आंदोलनांवर प्रभाव पडला असून त्यामुळे प्रतिकाराचे व समाजसुधारणेचे शक्तिशाली साधन म्हणून अहिंसा तत्वाचे महत्व अधोरेखित झाले आहे.
महात्मा गांधींची आजच्या जगातील समर्पकता
राजकीय , सामाजिक व पर्यावरणीय समस्यांनी ग्रासलेल्या आजच्या काळात महात्मा गांधींच्या अहिंसा तत्त्वावरील विश्वास आणखी बळकट होतो आहे. दहशतवाद, संघर्ष, हवामान बदल, आणि वाढती विषमता यावर तातडीने शांततामय उपाय शोधण्याची गरज आहे. मानवामधील अंगभूत चांगुलपणावर गांधींच्या असलेल्या विश्वासातून भेदाभेद, तसेच साथरोग किंवा गरिबीसारख्या आधुनिक जगातील समस्यांवर नक्कीच उपाय शोधता येतील.
शांतता ही केवळ एक दूरस्थ आदर्श नसून, गाठता येऊ शकणारे उद्दिष्ट आहे, हा विश्वास त्यांच्या तत्वज्ञानातून मिळतो! त्यांच्या शिकवणीतून आशा व सामंजस्याचा कालातीत संदेश मिळतो.
महात्मा गांधींची विचारधारा केवळ राजकीय आंदोलनांपुरतीच नव्हे तर शाश्वत विकासासाठी देखील उपयोगी आहे. त्यांचे सुप्रसिद्ध वचन आहे, “ जगात सर्वांच्या गरजेपुरती संसाधने आहेत,पण सर्वांच्या हावरटपणाला पुरेशी नाहीत.” यातून अहिंसा व संसाधनाचा जबाबदारीने वापर या दोन्हींमधील परस्परसंबंध अधोरेखित होतो. साधेपणा, संवर्धन व स्वावलंबनासारख्या त्यांच्या तत्वांचे प्रतिबिंब आजच्या काळातील स्वच्छता व पर्यावरण संवर्धन करणाऱ्या ‘स्वच्छ भारत अभियाना’त पडलेले दिसून येते.
अहिंसा तत्वाचा जागतिक उत्सव : गांधींच्या वारशाचा सन्मान
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनाच्या द्वारे महात्मा गांधींच्या शांतता व अहिंसा तत्वज्ञानाचे पुनर्स्मरण सर्व जगाला होत असते. त्यांच्या जयंतीदिनी साजरा होणाऱ्या या दिवशी त्यांनी आयुष्यभर प्रसार केलेल्या अहिंसात्मक प्रतिकाराच्या तत्वांना आपण आदरांजली वाहत आहोत.
भारतात २०२३ साली झालेल्या जी २० शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व जागतिक नेत्यांसह राजघाट येथे महात्मा गांधींना आदरांजली वाहिली होती. आपल्या सर्वसमावेशक, शांततापूर्ण व समरसतापूर्ण भविष्यकाळासाठी महात्मा गांधी यांच्या सत्य व अहिंसा या कालातीत तत्वांचे मार्गदर्शन सतत लाभत राहील यात शंका नाही.
2022 मध्ये, युनेस्को महात्मा गांधी शांतता आणि शाश्वत विकास शिक्षण संस्थेने (एमजीआयईपी) या दिवसाच्या स्मरणार्थ न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी महात्मा गांधींच्या पूर्णाकृती होलोग्रामने शांतता आणि शाश्वत समाजांना प्रोत्साहन देण्याचे एक साधन म्हणून शिक्षणावरील पॅनेल चर्चेचे नेतृत्व केले. राजदूत रुचिरा कंबोज आणि मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांची कन्या बर्निस ए किंग यांसारख्या मान्यवरांनी आधुनिक आव्हानांना सामोरे जाताना गांधींजींची आदर्श मूल्ये आजही किती प्रासंगिक आहेत यावर आपले विचार मांडले होते.
गांधींजींचा वारसा
महात्मा गांधींच्या शिकवणींचा भारताच्या सामाजिक आणि राजकीय चौकटीवर आजही खोलवर प्रभाव आहे. विविध सरकारी विभाग आणि संस्था सक्रियपणे त्यांच्या आदर्शांचे पालन आणि प्रचार करत आहेत आणि स्वच्छ, आत्मनिर्भर आणि शांततापूर्ण समाजाचे गांधींचे स्वप्न आधुनिक शासन आणि सार्वजनिक जीवनात अमलात येईल याकडे लक्ष देतात.
2014 मध्ये सुरू करण्यात आलेले स्वच्छ भारत अभियान हे राष्ट्र उभारणीसाठी महात्मा गांधींचे स्वच्छतेचे तत्वज्ञान आवश्यक असल्याचे प्रतिबिंबित करणाऱ्या सर्वात उल्लेखनीय उपक्रमांपैकी एक आहे. या अभियानाचा उद्देश स्वच्छ आणि निरोगी भारत निर्माण करणे हा असून, स्वच्छता हे ईश्वराचे दुसरे रूप आहे या गांधींच्या विश्वासाला अनुसरून आहे. ते नागरिकांना वैयक्तिक आणि सामुदायिक सहभाग वाढवून, त्यांच्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्याची सामूहिक जबाबदारी घेण्यास प्रेरित करते.
'स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता' या संकल्पनेसह स्वच्छता ही सेवा 2024 अभियान 17 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात आले. स्वच्छ भारत अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त आयोजित या अभियानाचा 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीदिनी समारोप झाला. स्वच्छता ही सेवा अभियानाने संपूर्ण भारतामध्ये स्वच्छता आणि आरोग्य सुरक्षा कायम राखण्यासाठी वर्तणुकीतील बदल आणि समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यावर भर दिला.
11 सप्टेंबर 2024 रोजी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी गांधी दर्शन, राजघाट, दिल्ली येथे महात्मा गांधींना समर्पित विशेष रेल्वे कोच चे उद्घाटन केले. रेल्वे मंत्रालयाद्वारे समर्पित हा कोच महात्मा गांधींच्या कालखंडातील काळजीपूर्वक पुनर्संचयित केलेला रेल्वे कोच आहे, जो राष्ट्राला एकत्र आणण्याच्या आणि न्याय आणि समानतेचा पुरस्कार करण्याच्या त्यांच्या ध्येयामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या प्रतिष्ठित रेल्वे प्रवासाचे प्रतीक आहे.
उद्घाटनादरम्यान, शेखावत यांनी सांगितले की या रेल्वे कोचचा थेट संबंध महात्मा गांधींच्या जीवनात एक परिवर्तन घडवणाऱ्या घटनेशी आहे आणि त्यांचे विचार प्रत्यक्ष सांगण्यासाठी त्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या कोचमधील गांधींच्या प्रवासाचे तसेच सहप्रवाशांसोबतच्या संवादाचे समृद्ध शिल्पांद्वारे चित्रण एक अविस्मरणीय अनुभव प्रदान करतो. गांधी दर्शनासाठी येणारे अभ्यागत आता हे क्षण पुन्हा जगू शकतील , गांधींच्या प्रवासाविषयी माहिती प्राप्त करू शकतील , जे अहिंसा आणि सामाजिक न्यायाचे तत्त्वज्ञान घडवण्यात महत्त्वपूर्ण होते.
हा ऐतिहासिक क्षण महात्मा गांधींच्या चिरस्थायी वारशाला तसेच भारताचे स्वातंत्र्य आणि एकतेप्रती त्यांच्या अतूट वचनबद्धतेला समर्पक मानवंदना आहे.
खादी : आत्मनिर्भरता आणि शाश्वततेचे प्रतीक
साधेपणा आणि आर्थिक स्वातंत्र्याचे प्रतीक असलेल्या हाताने कातलेल्या खादी या कापडाच्या प्रचारातून महात्मा गांधींनी आत्मनिर्भरता आणि शाश्वततेचा केलेला पुरस्कार सतत प्रतिध्वनीत होत आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोग दरवर्षी खादीचा प्रचार करून आणि ग्रामीण सक्षमीकरणाला प्रोत्साहन देऊन गांधी जयंती साजरी करते. 2023 मध्ये गांधी जयंती दिनी कनॉट प्लेस, नवी दिल्ली येथील खादी भवनने 1.52 कोटी रुपयांची उलाढाल करून खादी उत्पादनांच्या विक्रीचा एक नवीन विक्रम प्रस्थापित केला, जे स्वयंपूर्णतेच्या या प्रतीकाला समर्थन देण्याप्रति जनतेच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंबित करते.
डिजिटल स्मरणोत्सव
2019 मध्ये, पत्र सूचना कार्यालयाने (पीआयबी) महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीच्या स्मरणार्थ #Gandhi150 ही एक विशेष मायक्रोसाइट सुरू केली. या साइटवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट संग्रहातील दुर्मिळ व्हिडिओ क्लिप पहायला मिळतात, ज्यात गांधींच्या जीवनातील महत्त्वपूर्ण क्षण, जसे की त्यांचा प्रवास, अहिंसावरील भाषणे आणि लोकांशी संवाद दर्शवला आहे. या डिजिटल उपक्रमाने जनतेचा लक्षणीय सहभाग नोंदवला आहे, आणि 3.6 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि नवीन पिढ्यांपर्यंत गांधींचा संदेश पोहोचवला आहे.
निष्कर्ष
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन हा महात्मा गांधींच्या शिकवणींच्या चिरस्थायी प्रासंगिकतेचे एक शक्तिशाली स्मरण आहे. केवळ रणनीती म्हणून नव्हे तर जीवनपद्धती म्हणून अहिंसेचा स्वीकार करून आपण भावी पिढ्यांसाठी अधिक सामंजस्यपूर्ण आणि शाश्वत जग निर्माण करू शकतो. शिक्षण, जागरुकता आणि जागतिक आव्हानांवर अहिंसक उपायांना प्रोत्साहन देऊन आपण महात्मा गांधींच्या वारशाचा आणि मानवतेप्रति त्यांच्या सखोल योगदानाचा सन्मान करतो. अहिंसक कृतीतून शांतता प्राप्त करता येते हा त्यांचा कालातीत संदेश जगभरातील लाखो लोकांना आजही प्रेरणा देत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी