वारी भक्तीची, नास्तिकतावादाची नाही!
* श्रद्धेच्या नावाखाली विखारी विचारप्रणाली रुजवण्याचा प्रयत्न ! प्रस्तावना... महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नुकतेच शिवसेनेच्या सचिव व प्रवक्ता आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी वारीमध्ये अर्बन नक्षल्यांचा शिरकाव झाल्याची वस्तूस्थिती सदनासमो
वारी


* श्रद्धेच्या नावाखाली विखारी विचारप्रणाली रुजवण्याचा प्रयत्न !

प्रस्तावना...

महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नुकतेच शिवसेनेच्या सचिव व प्रवक्ता आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी वारीमध्ये अर्बन नक्षल्यांचा शिरकाव झाल्याची वस्तूस्थिती सदनासमोर मांडली आणि याची चौकशी करण्याची मागणी केली. डॉ. कायंदे यांनी ढोंगी पुरोगाम्यांचा बुरखाफाड केल्याने आता संविधानाच्या आडून स्वतःचा बचाव करण्याचा पवित्रा या लोकांनी घेतला आहे. डॉ. कायंदे यांनी जो आक्षेप घेतला आहे, तो संविधानाचे नाव पुढे करून या लोकांकडून केल्या जाणाऱ्या हिंदुद्रोहाविषयी आहे.

भारतीय संविधान सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते, परंतु याचा अर्थ असा नाही की, वारीचा वापर नास्तिकतेच्या प्रसारासाठी करण्यात येईल.

जर संविधान दिंडी खरंच सर्वसमावेशकता मांडते, तर ती फक्त वारीमध्येच का ? मातम, मोहरमला किंवा ख्रिस्ती नववर्षाच्या संध्येला का नसावी? हा दुजाभाव का ? ही चळवळ वारीसारख्या धार्मिक यात्रांचा आधार घेऊन साम्यवादी विचारसरणी रुजवण्याचा प्रयत्न करत आहे, हे निषेधार्ह आहे.

देव धर्म न मानणाऱ्यांचे वारीमध्ये काय काम ?

संपूर्ण महाराष्ट्रात लाखो वारकरी पांडुरंगाच्या चरणी एकवटतात, त्या वारीमध्ये अचानक 'पर्यावरण', 'संविधान', 'समता', अशा आडवळणी उद्दिष्टांसाठी दिंडी सजवून सहभागी होणं हे केवळ विरोधाभासीच नव्हे, तर वारीच्या मूळ भावनांना गालबोट लावणारे ठरते. श्रद्धेच्या नावाखाली वारकरीविरोधी विचारप्रणाली रुजवण्याचा प्रयत्न, हा वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक स्वरूपाला बाधक ठरतो. जो आक्षेप घेतला जात आहे, तो संविधानाच्या आडून चालवल्या जात असलेल्या कारवायांविषयी आहे. वर्ष २०२२ मध्ये नक्षलवादाचा आरोप असलेले शीतल साठे आणि सचिन माळी हे संविधान दिंडीमध्ये सहभागी झाले होते. त्या जोडीला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि तथाकथित पुरोगामी या दिंडीत सहभागी झाले होते. प्रश्न असा आहे की, जे देव-देश-धर्म मानत नाही, त्यांचे भक्तीचा मेळा असलेल्या वारीत काय काम ? बरं, या प्रवृत्ती केवळ हिंदु धर्म मानत नाही, भारतमातेला मानत नाही, एवढे पण एक वेळ ठीक होते; पण हे हिंदु धर्म आणि भारत यांना संपवण्याचा विडा घेऊन काम करत आहेत. आक्षेप इथे आहे. ज्यांना देवाधर्माला (केवळ हिंदूंच्या) शिव्याच द्यायच्या आहेत, ज्यांची मनोवृत्ती, कृती आणि भविष्यातील योजनाही जगातून जवळपास संपुष्टात आलेला साम्यवाद भारतात रुजवण्याची आहे, त्यांचे वारीमध्ये काय काम ?

समाजविघातक तत्त्वांवर अंकुश ठेवण्याची आवश्यकता !

बरं, याच लोकांनी पुण्यामध्ये शनिवारवाड्यावर सभा घेऊन संविधानाच्या नावाखाली ‘एल्गार’ केला होता. त्याचे धागेदोरे पुढे पंतप्रधानांच्या हत्येचा कट करण्याच्या प्रकरणात सापडले होते. जर ही मंडळी वारीमध्ये शिरत असतील, तर त्यांचा वारीत घातपात घडवण्याचा उद्देश नसेल कशावरून ? त्यामुळे केवळ सांस्कृतिकदृष्ट्या नाही, तर सुरक्षेच्या दृष्टीनेही याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आणि समाजविघातक तत्त्वांवर अंकुश ठेवण्याची आवश्यकता आहे.

वारीमध्ये नक्षलवादी शिरू नये म्हणून मागणी केलेली असताना वारीला बदनाम केले जात आहे असे सांगून एक प्रकारे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार वारीतील नक्षलवादाची व गंभीर आरोप असणाऱ्या लोकांना पाठीशी घालण्याचा व वारकऱ्यांची वारी पवित्र ठेवण्याला विरोधच करत आहेत. हा खूपच गंभीर प्रकार आहे. खरे तर वारीच्या रक्षणासाठी भूमिका घेण्याऐवजी वारीच्या मुळावर घाव घालणारी भूमिका काँग्रेस घेत आहे.

बेगडी संविधानप्रेम

या तथाकथित पुरोगाम्यांना जर खरेच संविधानप्रेम असेल, तर त्यांनी एक कृती करावी ! सध्या ‘समाजवाद’ आणि ‘धर्मनिरपेक्षता’ हे आणीबाणीच्या काळात प्रास्ताविकेत घुसडलेले शब्द हटवण्याची मागणी होत आहे. इंदिरा गांधी यांनी हे शब्द घुसडून संविधानाची हत्या केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान त्यांना मान्य नव्हते, असाच त्यातून अर्थ निघतो. जर समता दिंडी वाल्यांनी जर खरेच संविधानाविषयी कळकळ असेल, तर त्यांनी जाहीर मागणी करावी की, असंवैधानिक पद्धतीने संविधानात घुसडलेले ‘समाजवाद’ आणि ‘धर्मिनरपेक्षता’ हे शब्द हटवावेत. त्यांनी तसे केले नाही, तर त्यांचे संविधानप्रेम बेगडी आहे हे स्पष्ट होईल.

वारीवर राजकीय, वैचारिक, किंवा प्रचारकी ग्रहण लागू देता कामा नये !

आव्हाड म्हणतात की, वारकरी हा संविधानप्रेमी आहे. आमच्या संतांनीच आम्हाला समता, बंधुता शिकवली आहे. त्यामुळे संविधानाला जे अपेक्षित आहे, ते आमच्या संतांनी आधीच सांगितले आहे. वारकरी संविधान प्रेमी असू शकतो; पण संविधान प्रेमाचा आव आणून जे वारीत घुसले आहेत, ते वारकरी नाहीत, त्याचे काय ? याच आव्हाडांनी आतंकवादी इशरत जहा पोलीस चकमकीत ठार झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी लाखो रूपये देऊ केले होते. तिच्या नावाने रुग्णवाहिका चालू केली होती. जी व्यक्ती देशाच्या मूळावर उठलेल्या आतंकवाद्याप्रती सहानुभूती बाळगते, तिच्या तोंडी संविधानाची पूजा वगैरे शब्द शोभत नाहीत. वारी ही श्रद्धेची, शांतीची आणि संस्कृतीची चळवळ आहे. तिच्या आध्यात्मिक महत्त्वावर कुणाचेही विशेषतः देव - धर्म न मानणाऱ्यांचे प्रचारकी ग्रहण लागू देता कामा नये. संतांनीही ‘धर्माचे पालन करणे पाखंड खंडण’ आणि ‘नाठाळाचे माथी हाणू काठी’ अशी शिकवण दिली आहे. त्यामुळे या अर्बन नक्षल्यांना वारीतून हाकलणे, हेच संतांनाही अभिप्रेत आहे. समाज विघातक तत्वांना बाजूला करून वारीचे पावित्र्य जपणे ही ही एक प्रकारे देवपूजाच आहे. त्यामुळे वारीचे पावित्र्य टिकण्यासाठी वारीत शिरलेल्या अराजकवादी तत्त्वांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

- सुनील घनवट, राज्य संघटक, महाराष्ट्र व छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande