नाशिक, 25 ऑक्टोबर (हिं.स.)। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या केंद्रीय क्रीडा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद नांदेड विभागाने पटकावले. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे व प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली येथील के. टी. एच. एम. महाविद्यालयाच्या पटांगणावर हा दोन दिवशीय केंद्रीय क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. समारोप कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे विद्यापीठ वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, के. टी. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संपत काळे, विद्यापीठाच्या व्यावसायिक शिक्षण व कौशल्य विकास विद्याशाखेचे संचालक तथा नियोजन अधिकारी डॉ. राम ठाकर, नाशिक विभागीय केंद्राचे संचालक डॉ. प्रमोद रसाळ, विद्यापीठाच्या विद्यार्थी व बहि:शाल केंद्राचे प्रमुख डॉ. दयाराम पवार, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक . राजेंद्र वाघ, क्रीडा समन्वयक सिद्धांत टाक, जनसंपर्क अधिकारी महेंद्र बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते. समारोप प्रसंगी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने म्हणाले की कुठल्याही खेळाच्या निमित्ताने मन आणि शरीर एकत्र येत असते. त्यामुळे खेळ हा मेडीटेशनचाच एक प्रकार आहे. ज्याचा दैनंदिन आयुष्यात व भविष्यात देखील आपल्याला एकप्रकारे उपयोगच होत असतो. हल्लीची पिढी मोबाईल – संगणक यात हरवून जाते की काय असे वाटत असतांना या क्रीडा महोत्सवातील सहभागी तरुणाईस बघितल्यावर आशादायी चित्र निर्माण होते. सध्या भारतात विविध प्रकारच्या खेळांविषयी आवड निर्माण होवून एक खेळाची संस्कृती तयार होत आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये विविध खेळांची केंद्रे सुरु होत आहेत. कुठल्याही खेळामध्ये खेळाडूची जशी प्रतिस्पर्ध्याशी स्पर्धा असते तशी ती स्वत:शी देखील असते हे प्रत्येक खेळाडूने लक्षात ठेवावे असेही नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. विक्रम देशमाने आपल्या भाषणाचा शेवटी म्हणाले. अध्यक्ष पदावरून बोलतांना विद्यापीठाचे कुलसचिव श्री. दिलीप भरड म्हणाले की खेळात हार जीत सुरु असते. हरलेल्या खेळाडूंनी पुढील स्पर्धांमध्ये नव्या जोमाने उतरावे तर जिंकलेल्या खेळाडूंनी आगामी आंतरराज्य विद्यापीठ स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे नाव उज्वल करावे असे आवाहन कुलसचिव . दिलीप भरड यांनी केले. प्रमुखातीठी यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या खेळाडू विद्यार्थ्यांना पदक, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरवण्यात आले. तसेच स्पर्धेत पंच म्हणून कामगिरी बजावणाऱ्या डॉ. मीनाक्षी गवळी, शरद पाटील, मनीष देशमुख, आनंद काळे, राजेश क्षत्रिय, दीपक लबडे, शेखर भंडारी, चैतन्य दिवेकर, आदित्य अरडे, हेमंत काळे, ओम मोरे यांचा देखील प्रमुख अतिथी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सदर केंद्रीय क्रीडा महोत्सवात विद्यापीठाच्या अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर व नांदेड या आठ विभागीय केंद्रातील एकूण ३८१ खेळाडू विद्यार्थी सहभागी झालेले होते. त्यात कबड्डी, खो - खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, टेबल टेनिस, बुद्धीबळ. अँथलेटिक्स, बॅडमिंटन या खेळांचा समावेश होता. यातून निवड झालेले विद्यार्थी हे येत्या डिसेंबर २०२४ दरम्यान गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात होणाऱ्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतील. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जागृती चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक विद्यापीठाच्या विद्यार्थी व बहि:शाल केंद्राचे प्रमुख डॉ. दयाराम पवार यांनी केले. प्रमुख अतिथी यांचा परिचय श्रीमती मीनाक्षी कडेल यांनी करून दिला. विजेत्यांच्या नावाची उद्घोषणा व आभारप्रदर्शन सचिन शिंदे यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI