मुंबई, 26 ऑक्टोबर (हिं.स.)। बॉलिवूडचे पॉवरहाऊस असलेले अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा साहस आणि विनोद यांनी परिपूर्ण असा 'बड़े मियां छोटे मियां' हा चित्रपट प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट २७ ऑक्टोबर रोजी सोनी मॅक्सवर प्रदर्शित होणार आहे. टेलिव्हिजन प्रिमिअरच्या आधी अक्षय कुमारने टायगर श्रॉफबरोबर काम करण्याचा आपला अनुभव सांगितला. टायगर हा मला माझ्या धाकट्या भावासारखा आहे, तो म्हणाला. आम्ही लगेच मित्र झालो आणि आमची मैत्री आश्चर्यकारक आहे. धाडसी साहसदृष्ये सादर करण्यापासून ते व्हॉलीबॉल, लुडो यांसारखे खेळ आणि आराम करण्यापर्यंत आम्ही तासन्तास एकत्र घालवले आहेत. तो पूर्णपणे व्यावसायिक आहे आणि मी त्याच्याकडून खूप काही शिकलो आहे.
प्रामाणिकपणे सांगायचे, तर आता मी टायगरबरोबरच्या चित्रीकरणाला मुकणार आहे. 'बड़े मियां छोटे मियां' या अभिजात चित्रपटाचे हे आधुनिक सादरीकरण आहे. यात रोमांचक कथा, आश्चर्यकारक दृश्ये आणि चित्तथरारक साहसदृश्ये आहेत. या चित्रपटात दोन माजी सैनिकांची कथा आहे, जे जगाला धोकादायक संकटातून वाचवण्यासाठी सैन्यात सहभागी होतात. 'बड़े मियां छोटे मियां' हा सर्व वयोगटांतील प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा, साहस, विनोद आणि नाट्य यांचा परिपूर्ण मिलाप आहे. २७ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ८ वाजता या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर सोनी मॅक्सवर पाहायला विसरू नका.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर