- जागा बदलांवर झाली चर्चा
मुंबई, २६ ऑक्टोबर (हिं.स.) : जागावाटपाच्या चर्चेसारख्या काही गोष्टी शेवटच्या क्षणापर्यंत चालत असतात. आम्ही मैत्रीपूर्ण लढती कोणत्याही स्थितीत करणार नाही. महाविकास आघाडी म्हणूनच आमचा अधिकाधिक जागा जिंकण्याचा प्रयत्न असेल. आम्ही 180 हून अधिक जागा जिंकण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. महाराष्ट्रात आमचे सरकार स्थापन करण्याचा आमचा निर्धार असल्याचे कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
महाविकास आघाडीचे जागावाटप निकाली निघाल्याच्या दावा करणाऱ्या काँग्रेसने आज पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी जागा बदलावर चर्चा केली. ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज मातोश्रीवर जाऊन जागावाटपाविषयी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा निरोप त्यांना कळवला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना थोरात यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड देखील उपस्थित होत्या.
थोरात म्हणाले की, माझी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी माझ्यावर उद्धव ठाकरे व शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपवली होती. काही जागांमध्ये बदल होऊ शकतो का? हा विचार या चर्चेत होता. त्या दृष्टिकोनातून आमच्यात चर्चा झाली. मुंबईतील काही जागांवर अद्याप चर्चा करणे बाकी आहे. एकमेकांना मदत करून शक्य तेवढ्या जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री करायचा, हे आमचे लक्ष्य आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना दावा करीत असलेल्या जागांवर काँग्रेस सक्षम आहे, काँग्रेसकडे तगडे उमेदवार आहेत, किंबहुना काही जागांवर ठाकरेंनी उमेदवार जाहीर केले आहेत, तिथे काँग्रेसची लढण्याची तयारी झालेली आहे, असे सांगत जागांची अदलाबदल होऊ शकते का, याची चाचपणी थोरात यांनी केली.
---------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी