छत्रपती संभाजीनगर, 28 ऑक्टोबर (हिं.स.) - विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली. उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवसही जवळ आला. त्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर मध्यचे उमेदवार किशनचंद तनवानी यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने संभाजीनगर मध्य या मतदारसंघासाठी पहिल्या यादीत तनवानी यांचे नाव घोषित केले होते.
तनवानी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पक्षप्रमुखांनी (उद्धव ठाकरे) मला उमेदवारी दिली होती. ती उमेदवारी मी मागे घेतली आहे. 2014 ची परिस्थिती होऊ नये, यासाठी मी लढणार नाही, अशी विनंती उद्धव ठाकरे यांना केली. 2014 ला हीच परिस्थिती झाली होती. 2019 ला हीच परिस्थिती होणार होती. प्रदीप जैस्वाल यांची तब्येत ठीक नसतानाही मी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष असताना मी लढलो नाही. त्यांना पाठिंबा देऊन निवडून आणलं आहे. 2024 ला ते माझ्यासोबत राहील असं उद्धव साहेबांसमोर ठरलं होतं. आता त्यांनी पक्ष बदलला आणि एकनाथ शिंदे गटात त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. 2014 ची परिस्थिती होऊ नये, म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील विजयी झाले होते. अशा स्थितीत यावेळच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला अधिक संधी असल्याचे दिसते. मात्र दोन्ही शिवसेनेचे उमेदवार रिंगणात असतील तर मतांचं विभाजन होऊन त्याचा फायदा एमआयएमला होण्याची शक्यता होती.
यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटलं की, किशनचंद तनवाणी यांनी अशी भूमिका का घेतली माहीत नाही. त्यांनी आग्रहाने उमेदवारी घेतली होती. उमेदवारी मागून घेऊन अशी माघार घेणे मला चुकीचं वाटतं. तनवाणी यांनी माघार घेतली तरी आमच्याकडे पर्याय कमी नाही. तीन-चार जण इच्छूक आहेत. मात्र तनवाणी यांच्याशी बोलूनच पुढील निर्णय घेऊ.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी