रत्नागिरी : खल्वायनची दिवाळी पाडवा मैफल कोकण गंधर्व राजाभाऊ शेंबेकर रंगविणार
रत्नागिरी, 30 ऑक्टोबर, (हिं. स.) : येथील खल्वायन संस्थेची २७ वर्षे सातत्याने होणारी दिवाळी पाडवा विशेष संगीत मैफल यावर्षी चिपळूणचे कोकणगंधर्व राजाराम श्रीराम ऊर्फ राजाभाऊ शेंबेकर आपल्या गायनाने रंगविणार आहेत. ही मैफल येत्या शनिवार दि. २ नोव्हेंबर सा
राजाभाऊ शेंबेकर


रत्नागिरी, 30 ऑक्टोबर, (हिं. स.) : येथील खल्वायन संस्थेची २७ वर्षे सातत्याने होणारी दिवाळी पाडवा विशेष संगीत मैफल यावर्षी चिपळूणचे कोकणगंधर्व राजाराम श्रीराम ऊर्फ राजाभाऊ शेंबेकर आपल्या गायनाने रंगविणार आहेत. ही मैफल येत्या शनिवार दि. २ नोव्हेंबर सायंकाळी ५ ते ७ या वेळात गुरुकृपा मंगल कार्यालयात होणार आहे.

कै. पंडित राम मराठे, नूतन गंधर्व अप्पासाहेब देशपांडे, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित छोटा गंधर्व, पंडित नारायण बोडस, करवीर पीठाधीश ब्रह्मीभूत श्रीमत् विद्याशंकर स्वामी महाराज म्हणजेच हभप रामचंद्र कराडकरबुवा, कीर्तनसूर्य हभप दत्तदास घागबुवा या सर्व दिग्गज गुरूंच्या गायनाची एकलव्य पद्धतीने साधना केलेल्या राजाभाऊ शेंबेकर यांचे संगीत विशारदपर्यंतचे शिक्षण अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयात झाले आहे. भजनसम्राट कै. परशुरामबुवा पांचाळ, दशरथबुवा मयेकर, गायक नट कै. विश्वनाथ बागुल, कान्होपात्रा किणीकर, गायिका अभिनेत्री रजनी जोशी, पंडिता श्रृती सडोलीकर - काटकर, डॉ. कविता गाडगीळ, नूतन गंधर्व अप्पासाहेब देशपांडे इत्यादी प्रसिद्ध गायकांना राजाभाऊंनी संवादिनीची साथसंगत केली आहे. कीर्तनसूर्य हभप कै. दत्तदास घागबुवा यांना २२ वर्षे तसेच इतर नामवंत कीर्तनकार बुवांनासुद्धा त्यांनी ऑर्गन/पायपेटीची साथसंगत केलेली आहे. पुण्याचे नामवंत हार्मोनियम वादक राजीव परांजपे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले आहे. संगीत एकच प्याला, संगीत कट्यार काळजात घुसली, संगीत स्वयंवर या नाटकांमध्ये त्यांनी काही भूमिका, तसेच संगीत मार्गदर्शन व ऑर्गनसाथही केलेली आहे.

स्वरगंध देवगड, राज्यस्तरीय नाट्यगीत गायन स्पर्धा प्रथम क्रमांक, पनवेल कल्चरल सेंटरची शास्त्रीय संगीत गायन स्पर्धा द्वितीय क्रमांक इत्यादी स्पर्धांमधून त्यांनी सुयश प्राप्त केले असून गांधर्व महाविद्यालयाचा संगीतकार पुरस्कार, आंतरराष्ट्रीय लायन्स संघटनेचा गौरव पुरस्कार, नुकताच त्यांना प्राप्त झालेला बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचा बालगंधर्व रंगसेवा पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत.

रत्नागिरीतील त्यांच्या पाडवा मैफलीला तबलासाथ हेरंब जोगळेकर, हार्मोनियम/ऑर्गन साथ श्रीरंग जोगळेकर, पखवाज साथ मंगेश चव्हाण, व्हायोलीन साथ उदय गोखले तर तालवाद्य साथ सुहास सोहनी ही रत्नागिरीच्या कलाक्षेत्रातील नामवंत मंडळी करणार आहेत.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडने प्रायोजित केलेली ही संगीत सभा सर्व रसिक श्रोत्यांना विनाशुल्क असून मैफलीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन खल्वायनचे अध्यक्ष मनोहर जोशी आणि त्यांचे सहकारी यांनी केले आहे.

खल्वायनच्या पुढील ३०७ व्या मासिक संगीत सभेत शनिवारी, दि. ९ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध गायिका श्रृती बुजरबरुआ यांचे गायन होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर


 rajesh pande