ठाणे, 4 ऑक्टोबर (हिं.स.) स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या कर्नाटकातील काँग्रेस मंत्री दिनेश गुंडूराव यांनी २४ तासांत माफी मागावी, अन्यथा महाराष्ट्रात फिरु देणार नाही असा इशारा शिवसेना प्रवक्ते व खासदार नरेश म्हस्के यांनी दिला. सावरकर यांचा अपमान सहन करणाऱ्या उबाठाला बाळासाहेबांचा फोटो लावण्याचा अधिकार नाही, अशी घणाघाती टीका यांनी केली. ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या वैचारिकदृष्च्या भ्रष्ट झाली आहे. त्यामुळे त्यांच्या नेत्यांकडून सावरकरांबद्दल अशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत. कर्नाटकाचे मंत्री गुंडू राव यांनी सावरकरांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध करण्यासाठी उबाठा पत्रकार परिषद घेईल, असे वाटले होते मात्र प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. कारण ते सोनिया गांधी, राहुल गांधी यांना घाबरले असतील, असा टोला खासदार म्हस्के यांनी लगावला.
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंची अवस्था दयनीय झाल्याचे दिसले. शरद पवार, काँग्रेसचे वड्डेटीवार आणि इतर नेते ठाकरेंचा फोन उचलत नाही. यामुळे उबाठाचे अवसान गळाले आहे ते शांत झाले आहेत. याउलट संजय राऊत यांना महाविकास आघाडीत महत्व दिले जातंय. ही खंत उबाठाच्या चेहऱ्यावर दिसून आली. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले जात नाही त्यामुळे पत्रकार परिषदेत उबाठा नाराज दिसले, अशी टीका खासदार म्हस्के यांनी केली.
खुर्चीसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून आपण बसलात. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, हिंदुत्व, शिवसेना पक्षाचे विचार, पक्षाचे तत्व यावर उबाठा, आदित्य ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान खासदार म्हस्के यांनी दिले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावरकरांचा अपमान करणे हे काँग्रेसचे षडयंत्र आहे. काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध करण्याची हिंमत उबाठाने का दाखवली नाही, असा सवाल त्यांनी केला. त्यांना टोमणे मारण्याशिवाय काही येत नाही, असा टोला खासदार म्हस्के यांनी लगावला. शरद पवारांच्या घरची भांडी घासायला राऊत जातात. त्यामुळे संविधानाची तुलना भांडी घासण्याशी त्यांनी केली. संजय राऊत संविधानाचा अपमान करत आहेत, असे ते म्हणाले.
दिनेश गुंडू राव यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावर २४ तासांत माफी मागावी अन्यथा शिवसेना गुंडू राव यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा खासदार म्हस्के यांनी यावेळी दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर