धुळे, 21 डिसेंबर (हिं.स.) सुशासन सप्ताहाचे औचित्य साधून 'प्रशासन गाव की ओर' मोहिमेतंर्गत सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) धुळे कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सर्व मत्सपालन सहकारी संस्थाची एकदिवसीय कार्यशाळा कृषि विज्ञान केंद्र येथे संपन्न झाली.
या कार्यशाळेस मत्स्यव्यवसाय विभागाच्या ई-श्रम कार्ड योजना, अपघात गट विमा योजना, किसान क्रेडीट कार्ड तसेच नव्याने लागू झालेली NFDP अंतर्गत मच्छीमारांची तसेच मत्स्यसंवर्धकांची नोंदणी व विभागाच्या इतर योजना याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी प्रत्यक्ष नाव नोंदणीचे प्रात्यक्षिक जिल्हा समन्वयक (CSC) राकेश पाटील यांनी उपस्थितांना दिले.
या कार्यशाळेला कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक श्री. नांद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थांच्या व्यवस्थापनाबाबत शेखर साळी, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत जयेश बळकटे, सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तां). धुळे), संतोष देसाई, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, धुळे, अविनाश गायकवाड, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, धुळे यांनी मत्स्यव्यवसाय विषयक अडीअडचणी व त्यावरील उपययोजनांबाबत उपस्थितांना तांत्रीक मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा संघाचे सुरतसिंग ठाकुर, जिल्ह्यातील संस्थांचे पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी रा.अं. देशमुख यांचेसह मत्स्यव्यवसाय कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर