नियम 267 चा उपयोग व्यत्ययासाठी होतोय- उपराष्ट्रपती
संसदेतील गदारोळावर धनखडांनी व्यक्त केली नाराजी नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर (हिं.स.) : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधक सातत्याने गदारोळ करीत आहेत. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज, शुक्रवारी देखील हा गोंधळ कायम राहिल्याचे दिसून आले. त्यावर राज्यसभ
जगदीप धनखड


संसदेतील गदारोळावर धनखडांनी व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर (हिं.स.) : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधक सातत्याने गदारोळ करीत आहेत. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज, शुक्रवारी देखील हा गोंधळ कायम राहिल्याचे दिसून आले. त्यावर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी नाराजी व्यक्त करत नियम 267 चा उपयोग सभागृहाच्या कामकाजात व्यत्ययासाठी होत असल्याची खंत व्यक्त केली.

यासंदर्भात उपराष्ट्रपती म्हणाले की, अधिवेशन सुरू झाल्यापासून सातत्याने तेच-तेच मुद्दे वारंवार उपस्थित केले गेले असून आपण कामकाजाचे 3 दिवस वाया घालवले आहेत. सार्वजनिक कारणासाठी वचनबद्धता असलेले हे ते दिवस आहेत. अपेक्षेप्रमाणे आपण आपली कर्तव्ये पार पाडण्याची शपथ आपण प्रत्यक्षात आणली पाहिजे.वेळेचे नुकसान, संधी गमावणे, प्रश्नोत्तराचा तास होत नसल्यामुळे संधी गमावणे, यामुळे जनतेच्या हिताचे मोठे नुकसान होत आहे. माननीय सदस्यांनी सखोल चिंतन करावे. नियम 267 चा उपयोग व्यत्यय निर्माण करणारे अस्त्र म्हणून केला जात आहे, आपल्या दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण करण्यासाठी होत आहे. सदनात अत्यंत वरिष्ठ सदस्य आहेत. सदनातला गदारोळ ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचे धनखड म्हणालेत. तसेच या प्रकारावर मी तीव्र खेद व्यक्त करत असून ही अत्यंत दुःखाची ही बाब आहे. आपण अशोभनीय उदाहरण समोर ठेवत आहोत. या देशातील लोकांचा आपण अपमान करत आहोत. त्यांच्या अपेक्षांची पूर्तता आपण करत नाही. आपली कृती लोककेंद्रित नाही. लोकांमध्ये याबाबत नापसंती आहे. आपण असंबद्धतेच्या दिशेने जात आहोत अशा शब्दात धनखड यांनी नाराजी व्यक्त केली.

--------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande