राज्यातील २८८ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतमोजणीची तयारी पूर्ण
निवडणुकीच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष मुंबई, २० डिसेंबर (हिं.स.) । राज्यातील २८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून, उद्या रविवारी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निवडणूक आयोगा
निवडणूक लोगो


निवडणुकीच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष

मुंबई, २० डिसेंबर (हिं.स.) । राज्यातील २८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून, उद्या रविवारी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा सज्ज केल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोणता पक्ष सत्ता मिळवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यात २ डिसेंबर रोजी २६३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान झाले होते. उर्वरित २३ ठिकाणी आज, शनिवारी दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडले. अधिकृत वेळ संपल्यानंतरही अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याने उशिरापर्यंत मतदान सुरू होते.दरम्यान, राज्यातील बहुतांश भागांत मतदान शांततेत पार पडले असले तरी काही ठिकाणी तणावपूर्ण घटना घडल्याचे समोर आले आहे. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे महिलांना मंदिर आणि मंगल कार्यालयात डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला. प्रसादाच्या नावाखाली प्रत्येकी चार हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून महिलांना मंदिरात ठेवण्यात आल्याचा दावा संबंधित महिलांनी केला. इनानी मंगल कार्यालयात ठेवण्यात आलेल्या मतदारांची नंतर सुटका करण्यात आली. निवडणूक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता कोणताही गैरप्रकार आढळला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

धर्माबादमध्ये बाहेरील राज्यातील मतदारांकडून बोगस मतदान केल्याचा आरोपही करण्यात आला. या प्रकरणात एका महिला आणि पुरुषाला मारहाण झाल्याची घटना घडली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी मतदान केंद्राबाहेर सौम्य लाठीचार्ज केला. तसेच अंबरनाथमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेने बोगस मतदान केल्याचा आरोप भाजपाने केला, तर भाजप मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला. मातोश्री नगर परिसरात तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. तर कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील वार्ड क्रमांक तीनमधील एम.आर. हायस्कूल मतदान केंद्रावर वाद झाला. गोकुळचे चेअरमन नावेद मुश्रीफ यांना मतदान केंद्रात प्रवेश दिल्याबाबत विरोधकांनी आक्षेप घेतला. यानंतर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

कोपरगावमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये मतदान केंद्रावर बाचाबाची झाली. उमेदवारांचे प्रतिनिधी मतदारांवर प्रभाव टाकत असल्याचा आरोप दोन्ही गटांकडून करण्यात आला. एस. जी. महाविद्यालयातील मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण होते.

यासोबतच बारामतीच्या अहिल्यानगर देवी क्लब मतदान केंद्रावर एका मतदाराचे मतदान आधीच झाल्याचा प्रकार उघडकीस आला. संबंधित मतदार अमित दिलीप कुलथे यांचे मतदान कोणी तरी आधीच केल्याचे निदर्शनास आल्यानंतर निवडणूक कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडून टेंडर वोटद्वारे मतदान करून घेतले.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथे मतदान केंद्राबाहेर जादूटोण्याचे साहित्य आढळून आले. भारत माता शाळेच्या मतदान केंद्राबाहेर काळी बाहुली, लिंबू आणि अन्य साहित्य सापडल्याने खळबळ उडाली. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर नगर परिषदेच्या तीन जागांसाठी मतदान झाले. प्रभाग क्रमांक दोनमध्ये एका बोगस मतदाराला पकडण्यात आले असून, भावाच्या नावावर मतदान करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.दरम्यान, उद्या, रविवारी होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, निकालाकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.----------------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande