नाशिक, 9 नोव्हेंबर (हिं.स.)।विधानसभा निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांमध्ये सतर्क राहून पोलिसांनी गस्त वाढवली आहे. अशी माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी देताना सांगितले की, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित राहू नये म्हणून प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. निर्भय आणि मुक्त वातावरणात ही निवडणूक पार करण्यासाठी म्हणून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
राज्यात महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-२०२४ प्रक्रियेची आदर्श आचार संहिता आंमलात आहे. निवडणुक प्रक्रिया शांततेत, निर्भीड वातावरणात पार पडणेकरीता नाशिक परिक्षेत्रीय अहिल्यानगर, जळगांव, नाशिक ग्रामीण, धुळे व नंदुरबार जिल्हयांमध्ये निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना व पुर्वतयारी करण्यात आली आहे.असे सांगुन विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी सांगितले की, गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यांचे सीमेवरील नाशिक, धुळे, जळगांव व नंदुरबार जिल्हयांचे सरहद्दीवर एकुण ३८ चेक पोस्ट व ३४ चेक पोस्ट उभारलेले आहेत. या चेक पोस्टवरील तपासणीत आजपावेतो एकुण २ कोटी १० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल व रोख रक्कम जप्त केली आहे.
पाचही जिल्हयांमध्ये निवडणुकीचे पार्श्वभुमीवर २६४ भरारी पथके तयार करण्यात आलेली आहेत. आचारसंहिता सुरु झालेपासुन आजपावेतो नाशिक परिक्षेत्रामध्ये एकूण ६ कोटी ५३ लाख रोख रक्कम, ५२ अग्नीशस्त्रे व ८९ काडतुसे, १५३ इतर घातक शस्त्रे तसेच रु.५ कोटी ७५ लाम किंमतीची अवैध दारु, रु.२ कोटी ६७ लाख किंमतीचा गांजा,व अंमली पदार्थ व ३४ कोटी किंमत मौल्यवान दागिने व प्रलोभन वस्तु असा एकुण ४९ कोटी ०७ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाव रोख रक्कम जप्त केली आहे.असे सांगुन ते म्हणाले की, नाकाबंदी आणि गस्ती दरम्यान अहिल्यानगर जिल्हयात एकाच कारवाईत २३ कोटी लाख किंमतीचे सोन्या-चांदीचे दागीने व जळगांव जिल्हयात १ कोटी ४५ लाख रोख रक्कम केली आहे. नंदुरबार व धुळे जिल्हयांत मोठ्या प्रमाणावर तलवारी,चाकु, कोयते जप्त केले व धुळे घटकात गांज्याची शेती उध्वस्थ केली आहे. नाशिक जिल्हयात रु.२० लाख ३४ रुपयांचा गांजा वाहतुक करतांना जप्त केला आहे. अशा स्वरुपाच्या मोठा कारवाया करण्यात आहेत.
पाचही जिल्हयांमधील १६,८९१ सराईत गुन्हेगार व उपद्रवी इसमांविरुध्द विविध कलर्माखाली प्रतिबंधक कारवाया केल्या असुन त्यात एमपीडीए अंतर्गत १२ सराईत गुन्हेगारांना स्थानबध्द व १२३ इसमांविरुध्द तडीपारीची कारवाई केलेली आहे.असे सांगुन कराळे यांनी सांगितले की,निवडणुक प्रक्रियेकरीता केंद्रीय पोलीस दलाच्या एकुण ८४ प्लाटुन पाचही जिल्हयांमध्ये तैनात केल्या आहेत.
जिल्हयांमधील पोलीस अधिकारी व विविध विभाग प्रमुखांसोबत समन्वय बैठका घेऊन निवडणुक बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच गुजरात व मध्यप्रदेश राज्यांशी विविध स्तरांवर यापुढेही सराईत गुन्हेगार, उपद्रवी इसम, अवैध हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून अधिक धडक आणि कठोर कायदेशीर कारवाईत करण्यात येत आहे.
नाशिक परिक्षेत्रातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, विधानसभा निवडणुका नर्भय व मुक्त वातावरणात होण्यासाठी निवडणुकीचे अनुषंगाने आपणांस प्राप्त असलेली माहिती संबंधीत जिल्हयातील जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हा प्रमुख व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना अवगत करावी. तसेच सर्व नागरीकांना मतदानाचा हक्क बजावणीबाबत आवाहनही विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी सांगुन म्हणाले की,पोलीस अधिकारी व अंमलदार हे मतदान प्रक्रियेत व्यस्त असल्याने, त्यांना देखील मतदानाचा हक्क बजाविता यावा यासाठी पोस्टल बॅलेटची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI