रत्नागिरी, 12 नोव्हेंबर, (हिं. स.) : जेसीबी मशीनच्या साहाय्याने जमीन खोदताना मुळातून खोदून काढलेली ऐन, पांगारा ही झाडे राखीव वनक्षेत्रात ढकलून देऊन वनातील ५ झाडांना इजा पोहोचवल्या प्रकरणी जेसीबी ऑपरेटर आणि जमीनमालक यांच्यावर दापोलीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेसीबी ऑपरेटर हिरालाल रामेश्वर मेहता (सध्या रा. नवानगर ता. दापोली) तसेच जमीनमालक अन्वर महम्मद सुर्वे (सध्या रा. मुंबई) अशी दोघांची नावे आहेत. या दोघांवरही भारतीय वन अधिनियमातील तरतुदीनुसार दापोलीचे वनपाल आर. डी. खोत यांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत वन विभागाकडून देण्यात आलेली माहिती अशी की, दापोली परिमंडळातील ताडील या क्षेत्रातील ताडील, फॉ. स. नं. १७४ क्षेत्रालगत असणारे स. नं. ६१/१४३ जमीनदार यांनी जेसीबीच्या साहाय्याने जमिनीमध्ये उत्खनन करत असताना मुळातून खोदून काढलेली ऐन, पांगारा ही झाडे राखीव वनक्षेत्रात ढकलून देऊन वनातील ५ झाडांना इजा पोहोचवल्याचे आढळून आले. यात सुमारे ३५ लाखाचा जेसीबी (क्रमांक MH 08 AX 7963) पंचनामा करून जप्त करून ताब्यात घेतला आहे.
ही कारवाई दापोलीचे परिक्षेत्र वन अधिकारी पी. जी. पाटील, दापोलीचे वनपाल आर. डी. खोत, ताडीलच्या वनरक्षक शुभांगी भिलारे, बांधतिवरेचे वनरक्षक सूरज जगताप, कोंगळेच्या वनरक्षक शुभांगी गुरव यांनी विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
सरकारी वनातील माती, मुरूम, औषधी वनस्पती, झाडांची चोरी, अतिक्रमणाचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित वन विभागास कळवावे आणि राष्ट्रीय संपत्तीचे संरक्षण करण्यास शासनास सहकार्य करावे, असे आवाहन वन विभागाने केले आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणी सापडल्यास वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ७४९९५७५७८९ येते संपर्क साधावा, असे आवाहन दापोलीचे परिक्षेत्र वन अधिकारी पी. जी. पाटील यांनी केले आहे.
हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर