सांगली, ९ नोव्हेंबर (हिं.स.) :
महाराष्ट्रात निवडणुकांचे वातावरण तापले असतानाच सांगली जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. भारतीय जनता पक्षाचे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांची मालमत्तेच्या वादातून हत्या झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने सांगलीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, ही घटना मिरज-पंढरपूर मार्गावर घडली. प्राथमिक तपासानुसार, प्रॉपर्टीच्या वादातून हा हिंसक प्रकार झाला आहे. शनिवारी सकाळी राम मंदिराजवळ खाडे यांचा एका व्यक्तीसोबत वाद झाला होता. त्यामध्ये त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले. या हल्ल्यात खाडे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ मिरज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
सुधाकर खाडे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली होती आणि २०१४ साली तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. सध्या ते भाजपच्या उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांच्या हत्येमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आणि राजकीय सहकाऱ्यांमध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेतले असून महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातून तपास सुरू आहे.
हिंदुस्थान समाचार / Shuddhodana Mangorao