मुंबई, 14 डिसेंबर (हिं.स.)। आशुतोष गोवारीकर प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड (AGPPL) ने आज एक उल्लेखनिय बाब साधली आहे. AGPPL ने भारतीय मनोरंजनसृष्टीत दोन दशके पूर्ण केली असून, आज त्यांनी २० वर्षांचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.
फिल्मकेकर आशुतोष गोवारीकर आणि त्यांच्या पत्नी सुनीता गोवारीकर यांनी २००४ मध्ये AGPPL ची स्थापना केली होती, आणि याचं पहिले प्रोजेक्ट 'स्वदेश' हा चित्रपट होता जो घर आणि मानवतेला समर्पित आहे. या दोन दशकांमध्ये, AGPPL ने अनेक समीक्षकांच्या प्रशंसेला पात्र ठरून यशस्वी चित्रपट निर्माण केले आहेत, ज्यामध्ये जोधा अकबर, खेलें हम जी जान से, मोहनजो दाड़ो आणि पानीपत यांचा समावेश आहे.
या खास प्रसंगी, AGPPL ने एक विशेष ट्रेलर प्रदर्शित केला, जो त्यांचा २० वर्षाचा यशस्वी प्रवास दाखवतो. या ट्रेलरमध्ये प्रोडक्शन हाऊसच्या ऐतिहासिक चित्रपटांची झलक दाखवण्यात आली आहे ज्यामधून, कला, भव्यता आणि भावना, म्हणजेच एकंदरीत आशुतोष गोवारीकर यांचे सिनेमॅटिक व्हिजन दिसून येते.
या विशेष दिवसाच्या निमित्ताने निर्मात्या सुनीता गोवारीकर म्हणाल्या, AGPPL, माझं तिसरं बाळ आहे, जे २००४ मध्ये जन्मले आणि आज ते २० वर्षांचं झालं आहे. कठोर मेहनत, चांगल्या आणि वाईट काळात या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्याचा प्रवास एक रोलरकोस्टर सारखा होता आणि मी त्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला आहे. मागे वळून पाहताना, मला खूप अभिमान वाटतो. हे २० वर्ष सहकार्य, क्रिएटिव्हिटी आणि अनोख्या समर्पणाची असाधारण जर्नी होती आणि आम्ही भविष्यात आणखी नवे प्रोजेक्ट करण्यासाठी उत्साही आहोत.
या प्रवासाविषयी व्यक्त होताना आशुतोष गोवारीकर म्हणाले की, सुनीता आणि मी AGPPL ची सुरुवात एका स्वप्नाने केली होती, की त्याच गोष्टी मांडायच्या ज्या मनाला भिडतील आणि प्रेरित करतील. या कंपनीच्या माध्यमातून मला अनेक प्रतिभावान लोकांना भेटण्याचं आणि त्यांच्याशी सहकार्य करण्याचं भाग्य लाभलं, ज्यामुळे हा प्रवास अद्भुत बनला. २० वर्षांचा हा टप्पा अभिमान आणि कृतज्ञतेचा क्षण आहे. हे सर्वकाही कलाकार, टेक्निशियन आणि क्रू सदस्यांच्या योगदानामुळे शक्य झालं आहे. त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आमच्या माय बाप रसिक प्रेक्षकांनी आम्हाला जे प्रेम दिलं त्यासाठी त्यांचे आभार व्यक्त करतो.
AGPPL प्रोडक्शन हाऊस मनोरंजन, शिक्षण आणि प्रेरणा देणाऱ्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रतिबद्ध आहे.
आशुतोष गोवारीकर प्रोडक्शन्सची पहिली फीचर फिल्म 'स्वदेश' (२००४) होती, आणि त्यानंतर आशुतोष गोवारीकर आणि सुनीता गोवारीकर यांनी आपले स्वतःचे फिल्म प्रोडक्शन हाऊस AGPPL स्थापन केले.
स्क्रीन, टेलीव्हिजन, म्युझिक आणि OTT सर्व प्लॅटफॉर्मवर कंटेंट निर्माण करण्यासाठी AGPPL ने UTV, Disney, PVR, Star Plus आणि T-Series यासारख्या प्रमुख इंडस्ट्री टॅलेंट आणि स्टुडिओसह कोलॅबरेशन केलं.
AGPPL ने नेहमीच आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून राष्ट्रवाद, देशभक्ती, धार्मिक सहिष्णुता, जाती व्यवस्था, महिला सशक्तीकरण, मुलींचे संरक्षण यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण सामाजिक मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे, ज्याला भारत आजही तोंड देत आहे.
AGPPL चित्रपटांना भारतात राष्ट्रीय पुरस्कारांसह भारतीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये देखील अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर